कोरोनाबाधितांमुळे अचलपूरमधील दोन शाळांचे निर्जंतुकीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:14 IST2021-01-20T04:14:13+5:302021-01-20T04:14:13+5:30
अनिल कडू परतवाडा : अचलपूर शहरातील एकाच रहिवासी वस्तीत सहा कोरोना संक्रमित निघाल्यानंतर दोन शाळांचे निर्जंतुकीकरण केले गेले. दगावलेली ...

कोरोनाबाधितांमुळे अचलपूरमधील दोन शाळांचे निर्जंतुकीकरण
अनिल कडू
परतवाडा : अचलपूर शहरातील एकाच रहिवासी वस्तीत सहा कोरोना संक्रमित निघाल्यानंतर दोन शाळांचे निर्जंतुकीकरण केले गेले. दगावलेली कोरोनाबाधित व्यक्ती यापैकी एका शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी असल्यामुळे आणि कोरोनाबाधित शिक्षकही त्याच शाळांमध्ये कार्यरत असल्यामुळे हा जनमानसातील चर्चेचा विषय ठरला आहे.
तडकाफडकी निर्जंतुकीकरण करण्यात आलेल्या दोन्ही शाळा अचलपुरातील एकाच शैक्षणिक संस्थाद्वारे संचालित आहे. संचालकांनी शालेय प्रशासनामार्फत सर्वच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी करवून घेण्याचे सूचित केले आहे. यामुळे कार्यरत सर्वांनाच कोविड टेस्ट करावी लागणार आहे.
यापूर्वी पहिल्यांदा जेव्हा शाळा सुरू झाल्या तेव्हा या दोन्ही शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड चाचणी केली होती. त्यावेळी या दोन्ही शाळांतील अनेकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे या शाळा चर्चेत आल्या होत्या. याच शाळांमधील काहींची ग्रामपंचायत निवडणुकीत ड्युटी लागल्यामुळे त्यांनी कोविड चाचणी केली. अशांनाही आता परत कोविड चाचणी करावी लागणार आहे. या सर्व घटनाक्रमात दत्त जयंतीच्या पारायणासह जेवण आणि नातवाचा वाढदिवस चांगलाच चर्चेत आला आहे.
बॉक्स
दत्ताचे पारायण, जेवण
दगावलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्याची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून नरम-गरम होती. अधिकचे दुखणे अंगावरच काढण्याचा प्रयत्न केल्याने पत्नीलाही त्रास जाणवू लागला. यादरम्यान दत्तजयंती आली. तापातच थंडीत उघड्या अंगाने सोवळ नेसून दररोज सकाळी त्यांनी दत्ताचे पारायण केले. पारायणाच्या समाप्तीला जेवण ठेवले. दोन्ही शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह ओळखीच्यांना त्यांनी आमंत्रित केले. उपस्थितांपैकी काहींना कोरोनाची लागण झाली. यानंतर पत्नीसह अमरावतीला दाखल शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे दत्त जयंतीचे ते पारायण आणि जेवण आज चर्चेत आले.
बॉक्स
नातवाचा वाढदिवस
याच शाळेचे माजी मुख्याध्यापक आणि कार्यरत शिक्षिका आपल्या नातवाच्या वाढदिवसाकरिता अचलपूरहून कोल्हापूरला गेले आणि सोबत कोरोना घेऊन आले. यानंतर अचलपूर कुटीर रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले.
कोविड चाचणीची चालढकल
दत्त जयंती पारायण व जेवणाला उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोरोनाच्या अनुषंगाने स्वत:विषयी साशंक आहेत. कोविड चाचणी पॉझिटिव्ह येऊ शकते. मग पुढचे दहा-पंधरा दिवस शाळेत प्रवेश मिळणार नाही. अर्जित रजा खर्ची पडतील, याची त्यांना काळजी लागली आहे. जे जेवणावळीला गेेले, ते जात्यात आणि हजर झाले नाही, ते सुपात आहेत.