अमरावतीत राज्य चोरांचे

By Admin | Updated: June 16, 2014 23:14 IST2014-06-16T23:14:22+5:302014-06-16T23:14:22+5:30

पोलीस आयुक्त सुरेश मेकला कडेकोट सुरक्षेत आणि अमरावतीकर चोरांच्या हवाली, असे भीतीदायक चित्र अंबानगरीत निर्माण झाले आहे.

State thieves in Amravati | अमरावतीत राज्य चोरांचे

अमरावतीत राज्य चोरांचे

पोलीस आयुक्त कडेकोट सुरक्षेत : अमरावतीकर चोरांच्या हवाली!
गणेश देशमुख - अमरावती
पोलीस आयुक्त सुरेश मेकला कडेकोट सुरक्षेत आणि अमरावतीकर चोरांच्या हवाली, असे भीतीदायक चित्र अंबानगरीत निर्माण झाले आहे.
संतांच्या या भूमीतील नागरिकांच्या मुखात हल्ली हरिनामाऐवजी चर्चा असतात त्या केवळ चोरांच्याच. चोर कधीही येतील. घर फोडून त्यांना वाट्टेल ते घेऊन जातील. आपण दिसलो तर आपलाही जीव घेतील, अशा धास्तीत अमरावतीकर एकेक दिवस कंठत आहेत. येणारी प्रत्येक रात्र आणि उजाडणारा हरेक दिवस घेऊन येतोय ती केवळ दहशतच!
'आयपीएस'पेक्षा चोर तल्लख ?
कायद्याचे जराही भय नसलेले चोर पोलिसांच्या नाकावर टिच्चून रोज घरे फोडत आहेत. लपून छपून एखाददुसरे नव्हे, राजरोसपणे रोज तीन-तीन घरे फोडताहेत. दीड महिन्यांत ४६ घरफोड्या झाल्यात. घरफोड्यांचा हा सपाटा चोरांचा नित्यक्रम ठरला आहे. एकट्या राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यातील १६ घरफोड्या आहेत. कोण गावी गेले? कुणाच्या घरी ऐवज आहे? कुणाकडे कशी चोरी करायची? पळून जाण्यासाठी मार्ग कुठला? पोलिसांना गाफिल ठेवायचे कसे? चौर्यकार्य आटोपल्यावरची सावधगिरी काय? या बाबींचा इत्यंभूत अभ्यास चोरांना आहे. पोलिसांना मात्र; चोर कधी येतात? कसे येतात? केव्हा येतात? चोरी कशी करतात? दारे, घरे कशी फोडतात? वस्तीतल्या कुत्र्यांना ते कसे आपलेसे करतात? घरे फुटतात; परंतु चोर दिसत का नाहीत? या प्रश्नांची उत्तरे पोलिसांकडे नाहीत. अमरावतीकरांनी याचा अर्थ काय समजायचा? आयपीएस असलेले पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला आणि एमपीएससी परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या शेकडो पोलीस अधिकाऱ्यांपेक्षा घरफोड्या करणारे भामटे अधिक कुशाग्र, चाणाक्ष, तीक्ष्ण, नियोजनबद्ध आणि धैर्यवान आहेत? की मग, पोलिसांची या चोरट्यांसोबत व्यावसायिक मैत्री आहे? घरफोडीच्या चटक्यांनी रोज रोज भाजणाऱ्या सामान्य नागरिकांनी निष्कर्ष तरी काय काढायचा?

Web Title: State thieves in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.