राज्य वाळूमाफियांचे; अभय जिल्हाधिकाऱ्यांचे
By Admin | Updated: June 21, 2016 00:00 IST2016-06-21T00:00:02+5:302016-06-21T00:00:02+5:30
जिल्ह्यातील १०९ रेतीघाटातून रात्रंदिवस नियमबाह्यरीत्या गौणखनिजांचे उत्खनन सुरू आहे.

राज्य वाळूमाफियांचे; अभय जिल्हाधिकाऱ्यांचे
‘सोन्याची अंडी देणारी कोंबडी’ : करोडोंचा महसूल चोरी, निष्पापांचे बळी, हेच का ‘अच्छे दिन’ ?
अमरावती : जिल्ह्यातील १०९ रेतीघाटातून रात्रंदिवस नियमबाह्यरीत्या गौणखनिजांचे उत्खनन सुरू आहे. विहित परिमाणापेक्षा अधिक रेतीची खुलेआम वाहतूक होत असताना जिल्ह्याचे पालनकर्ते म्हणविणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांसह इतर अधिकारी मात्र धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहेत. अवैध उत्खनन व गौणखनिजांच्या बेकायदेशीर वाहतुकीला जिल्हाधिकारी किरण गित्ते यांचा वरदहस्तच कारणीभूत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
प्रशासनाकडून कोणताच अंकुश नसल्याने मस्तवाल झालेल्या वाळूमाफियांनी जिल्ह्यात अक्षरश: धुमाकूळ घातलाय.
त्यांचा गुंडाराज शिगेला पोहोचला आहे.
जड वाहतुकीने रस्त्यांची दैना
अमरावती : कोट्यवधींचा महसूल चोरीला जात आहे. वाळूतस्करांच्या ओव्हरलोड वाहनांच्या अहोरात्र सुरू असलेल्या वाहतुकीमुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. बेधुंद वाहतुकीमुळे नागरिकांचे बळी जात आहेत.
जिल्ह्यात वर्धा, पूर्णा, पेढी, चंद्रभागा व सापन नदीपात्रात १०९ रेतीघाटांचे लिलाव झाले. या घाटांचा ३० सप्टेंबर हा अंतिम कालावधी आहे. सध्या मान्सूनचे आगमन होऊन पावसाला सुरुवात झाली आहे. जुलै महिन्यात अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. परिणामी नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढून रेतीघाट पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या या घाटांतून जेसीबीच्या सहाय्याने अहोरात्र उत्खनन सुरू आहे. रेतीघाटांत कुठल्याही यंत्राचा वापर करण्यास मनाई असताना महसूल विभागाच्या संगनमताने रात्रंदिवस उत्खनन होत आहे. एका रेतीघाटातून एक व जास्तीत जास्त २ ब्रास रेती वाहतुकीची शासन परवानगी असताना ४ ते ६ ब्रास रेतीची सर्रास वाहतूक होत आहे. या ओव्हरलोड वाहतुकीने घाटालगतच्या गावातील अंतर्गत रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली आहे. राज्य महामार्ग ठिकठिकाणी उखडले आहेत. दिवसभरात अधिकाधिक फेऱ्या व्हाव्यात, यासाठी ओव्हरलोड ट्रकमदून बेधूंद वाहतूक सुरू असताना आजवर झालेल्या अपघातात कित्येक निर्दोष नागरिकांचे हकनाक बळी गेले आहेत.
रेतीघाटात विहित मर्यादेच्या बाहेर उत्खनन सुरू आहे. तसेच वापरात असलेल्या रस्त्यांची डागडुजी लिलावधारकाने करण्याचा नियम असताना आजवर रस्त्याची दुरूस्ती घाट लिलावधारकाने केलेली नाही.
दिशाभूल करण्यासाठी मालवाहू ट्रकचा वापर
शासकीय यंत्रणेची व नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी वाळूमाफियांद्वारे आता टिप्पर ऐवजी १० चाकांच्या मालवाहू ट्रकचा वापर करण्यात येत आहे. हा ट्रक काळ्या ताडपत्रीने झाकला जातो व यामध्ये १२ ब्रासपेक्षा अधिक रेतीची वाहतूक राष्ट्रीय महामार्गाने पहाटेच्यावेळी करण्यात येते. अमरावती व नागपूर येथील वाळूमाफिया अधिक सक्रिय आहेत.
‘स्मॉट्स’ प्रणालीला वाळूमाफियांचा चकमा
महाआॅनलाईनने निर्माण केलेल्या मोबाईल आधारित सुलभ ‘स्मॉट्स’ (सॅन्ड मॉयनिज अप्रुव्हल अॅन्ड ट्रॅकिंग) प्रणालीचा वापर सध्या रेतीघाट व रेतीच्या वाहतुकीसाठी करण्यात येतो. रेती लिलावधारकांसह तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदारांना हे अॅप्स देण्यात आले आहेत. याद्वारे इन्व्हॉईस नंबर देण्यात येतो. याद्वारे ट्रक कुठल्या घाटातून आला, कोठे चालला, किती वेळात पोहोचेल, ट्रक नंबर, किती ब्रास रेतीची परवानगी याची पूर्ण माहिती तपासता येते. ही एसएमएस प्रणाली आहे. मात्र, या प्रणालीस चकमा देऊन किंबहुुना वाळूघाट लिलावधारक व वाळूमाफियांंच्या संगनमताने शासन महसुलाला दररोज लाखोंचा चुना लावला जात आहे.
महसूल यंत्रणेचे वरातीमागून घोडे
झोपी गेलेल्या महसूल यंत्रणेमुळे वाळूमाफियांचा हैदोस सुरू आहे. याविषयी युवक काँग्रेसने प्रशासनाच्या नाकर्तेपणाचे पुरावे दिल्यामुळे नाईलाजाने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी कनिष्ठांना कारवाईचे आदेश दिलेत. दोन दिवसांत चांदूररेल्वे येथे १५ व तिवसा येथे ३ ट्रकवर महसूल विभागाद्वारा कारवाई करण्यात आली. दररोज रेतीची ओव्हरलोड वाहतूक होते, हे त्यातून सिद्ध झाले आहे.
एका आठवड्यात चार नागरिकांचा बळी
रेतीच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे शनिवारी धामणगाव तालुक्यात बोरगाव निस्ताने येथे पितापुत्राला तर राष्ट्रीय महामार्गावर सावर्डीजवळ दोन व्यक्तींना वाळूमाफियांच्या वाहनांनी चिरडले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५० वर नागरिकांचा या बेधूंद वाहतुकीने बळी घेतला आहे.
युवक काँग्रेसने दिले वाळूतस्करांचे पुरावे
तिवसा, चांदूररेल्वे व धामणगाव तालुक्यामधील रेतीघाटांतून रेतीचे नियमबाह्य उत्खनन व विहित परिमाणापेक्षा अधिक ब्रास रेतीची वाहतूक होत असल्याचे पुरावे युकाँचे पदाधिकारी व तिवसा नगरपंचायतीचे उपाध्यक्ष वैभव वानखडे यांनी तिवसा तहसीलदारांसह जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र, यापूर्वी कुठलीच करवाई झाली नसल्याने महसूल विभागाचे वाळूतस्करांशी संगनमत असल्याचा या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे.
कन्हान रेतीचा प्रत्येक ट्रक 'ओव्हरलोड'
नागपूर विभागातील कन्हान रेतीची बांधकामासाठी अधिक मागणी असल्याने अमरावतीसह अकोला जिल्ह्यापर्यंत या रेतीचे ओव्हरलोड ट्रक रात्रंदिवस धावत असतात. दोन ब्रासची परवानगी असताना टिप्पर, डम्परद्वारे या रेतीची वाहतूक प्रादेशिक परिवहन विभागाच्या संगनमताने होत आहे. यासाठी या विभागाला तगडा मलिदा महिन्याकाठी मिळतो. नागरिकांच्या रक्ताने प्रशासनाचे हात माखले आहेत.
वाळूवाहतूक ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी असल्याने जिल्हाधिकारी तिचा गळा कसा दाबणार? घाटावर रेती मोजून देण्याची जबाबदारी घाट लिलावधारकांची आहे. ओव्हरलोड रेतीचा ट्रक सापडल्यास पहिली कारवाई घाट लिलावधारकावर करून घाट सील करावे. तहसीलस्तरावर कारवाई होत नसल्याने आता जिल्हाधिकाऱ्यांनीच कारवाई करावी. - सुनील देशमुख, आमदार