State Ministers interact with children of brick kilns | राज्यमंत्र्यांचा वीटभट्टी मजुरांच्या मुलांशी संवाद

राज्यमंत्र्यांचा वीटभट्टी मजुरांच्या मुलांशी संवाद

ठळक मुद्देबच्चू कडू : मुलांच्या आरोग्य, शिक्षणासाठी कृती आराखडा तयार करा

लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव बारी : वीटभट्टी मजुरांच्या मुलांच्या आरोग्य व शिक्षणाच्या प्रश्नांबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तात्काळ कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश जलसंपदा, शालेय शिक्षण, कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सोमवारी येथे दिले.
वीटभट्टी मजुरांच्या मुलांचे आरोग्य व शिक्षणासंबंधी उपाययोजनांबाबत बडनेऱ्याच्या वीटभट्टी परिसरातील बंडेश्वर भद्रा हनुमान मंदिरात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसीलदार संतोष काकडे, डेप्युटी सीईओ प्रशांत थोरात, सीएस श्यामसुंदर निकम, माध्यमिक शिक्षणाधिकारी नीलिमा टाके, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख व वीटभट्टी व्यावसायिक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
उन्हातान्हात राबणाºया वीटभट्टी मजुरांचे आयुष्य कष्टप्रद आहे. त्यांना योजनांचा लाभ मिळावा, त्यांच्या मुलांच्या आरोग्याचा प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. त्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून कृती आराखडा तयार करावा. वीटभट्टी कामगार, लहान मुले, स्तनदा मातांसाठी योजना राबविण्यासंदर्भात मिशनमोडवर आराखडा तयार करावा.
बडनेरा ते अंजनगाव बारी परिसरात सुमारे ८० वीटभट्ट्या असून, तीनशे ते ३५० कामगार आहेत. आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात मजूर कामासाठी कुटुंबासह येतात. त्यामुळे त्यांच्या मुलांचे शिक्षण खुंटते व आरोग्याकडेही दुर्लक्ष होते. त्यादृष्टीने कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कामगार विभागाने सर्व कामगारांची नोंदणी करून त्यांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा. वीटभट्टी व्यवसाय परिसराचा नकाशा तयार करून त्यात परिसरनिहाय आवश्यक सुविधांसाठी कृती आराखडा करावा, असे निर्देश राज्यमंत्री ना. कडू यांनी दिले.
परिसरात आरोग्य तपासणी नियमित व्हावी, शिबिरे घ्यावीत. अंगणवाड्यांतून आहार द्यावा, फिरती पोषण आहार व्यवस्था सुरू करावी. राजीव गांधी पाळणाघर योजनेत स्वयंसेवी संस्थेमार्फत पाळणाघर तत्काळ सुरू करावे. यासाठी आवश्यक फंड उभारण्यात येईल. वीटभट्टीमालक, अधिकारी, कर्मचारी यांनीही योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
 

Web Title: State Ministers interact with children of brick kilns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.