राज्य महामार्ग ठरतोय कर्दनकाळ
By Admin | Updated: September 13, 2015 00:12 IST2015-09-13T00:12:20+5:302015-09-13T00:12:20+5:30
अचलपूर आणि परतवाडा या जुळ्या शहराच्या मधातून गेलेल्या राज्य महामार्ग नागरिकांसाठी कर्दनकाळ ठरत आहे.

राज्य महामार्ग ठरतोय कर्दनकाळ
अचलपूर : अचलपूर आणि परतवाडा या जुळ्या शहराच्या मधातून गेलेल्या राज्य महामार्ग नागरिकांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. हा मार्ग शहराबाहेरून बायपास काढावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
चंद्रपूर भुगूस ते अमरावती व्हाया परतवाडा ते भोकरबर्डी असा २१६ किलोमिटर लांबीचा हा राज्यमहामार्ग क्रमांक १४ आहे. अमरावती ते भोकरबर्डीपर्यंत साधारण १२९ किलोमीटर लांब आहे. हा महामार्ग भोकरबर्डीपासून पुढे मध्यप्रदेश ते बऱ्हाणपूरपर्यंत जातो. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक राहते. मोठ-मोठी जड वाहने या रस्त्यावरून धावतात. अचलपूर नाका ते चिखलदरा स्टॉपपर्यंत हा मार्ग दुचाकीस्वार, विद्यार्थी सर्वसामान्य नागरिक यांच्यासह आदींसाठी कर्दनकाळ ठरत आहे. दररोज लहान मोठे अपघात ठरलेले असतात. यापूर्वी अपघातात ठार झाल्याच्या घटनाही या रस्त्यावर घडल्या आहेत. मोकाट जनावरांनाही वाहनांची धडक बसून गंभीर जखमी झाल्याची उदाहरणे असून प्रसंगी जीवही गेले आहेत.
अचलपूर नाक्यापासून चिखलदरा स्टॉपपर्यंत याचे अंतर साधारणत: ७ ते ८ किलोमिटर असू शकते. यादरम्यान हातगाडीवाले, पानटपरी, चहा कॅन्टींगवाले आदींनी अतिक्रमण केले आहे. निवासी रस्ता अरुंद आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अतिक्रमणधारकांना बऱ्याच वेळा नोटीस देण्यात आल्यात. दोनतीन वेळा अतिक्रमण काढण्यात आले. पण काही दिवसांनी ते ‘जैसे थे’ होते. काही बडे दुकानदार आपल्या दुकानातील विक्रीचा माल दुकानाबाहेर रस्त्यालगत आणून ठेवतात. तसेच दुकानदारांना पार्किंगसाठी जागा नसल्याने रस्त्यावरुच खेटून ग्राहकांची वाहने उभी असतात. बऱ्याचदा वाहने रस्त्यावर उभी असताना पोलीस बघ्याची भूमिका घेतात. त्यामुळे मूळ रस्त्याची रुंदी कमी होते. वाहनधारकांना कसरत करत मार्गक्रमण करावे लागते. (शहर प्रतिनिधी)