वृक्ष लागवडीवर राज्य सरकार ठेवणार सॅटेलाईटद्वारे 'वॉच'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 20:02 IST2018-05-04T20:01:02+5:302018-05-04T20:02:46+5:30
दर तीन महिन्यांनी आढावा घेतला जाणार

वृक्ष लागवडीवर राज्य सरकार ठेवणार सॅटेलाईटद्वारे 'वॉच'
अमरावती : वनयुक्त शिवार योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीवर सॅटेलाईटद्वारे लक्ष ठेवलं जाणार आहे. वृक्षारोपणापूर्वीचे खड्डे आणि वृक्षारोपण झाल्यानंतरची रोपं यांचा आढावा दर तीन महिन्यांनी घेतला जाणार आहे. याबद्दलची माहिती शासनाकडे ऑनलाइन पाठवावी लागणार आहे.
१ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत राज्यभरात 13 कोटी वृक्ष लावले जाणार आहेत. या सर्व वृक्षांवर सॅटेलाईटद्वारे लक्ष ठेवलं जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य शासनाचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून पाच वर्षात ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवलं आहे. त्यानुसार जुलै महिन्यात १३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. वनविभाग, सामाजिक वनीकरण या प्रमुख विभागांसह सर्वच शासकीय, प्रशासकीय यंत्रणांना वृक्ष लागवडीसाठी ठराविक लक्ष्य देण्यात आलंय.
वृक्षलागवड, संवर्धनाबाबत वन विभागाकडून अन्य यंत्रणांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. १३ कोटी वृक्ष लागवडीबाबत वन विभागाच्या पोर्टलवर माहिती उपलब्ध असल्याचं अमरावती सामाजिक वनीकरणाचे उपवनसंरक्षक प्रदीप मसराम यांनी ‘लोकमत’ला सांगितलं. ही मोहीम कागदोपत्री असू नये, यासाठी वृक्षारोपणाचे स्थळ, छायाचित्र, सर्वे क्रमांक, गावाचे नाव, वृक्षाची प्रजाती, यंत्रणेचे नाव अशी माहिती ऑनलाइन पाठवावी लागत आहे. त्यामुळे वृक्षारोपणापूर्वीच्या आणि वृक्षारोपणानंतरच्या परिस्थितीवर शासन सॅटेलाइटद्वारे ‘वॉच’ ठेवणार आहे.