राज्य शिक्षण मंडळाचे सर्व्हर डाऊन, कॉपीप्रकरणांची माहिती नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 21:01 IST2020-03-12T20:57:00+5:302020-03-12T21:01:26+5:30
अमरावती विभागात दहावीच्या परीक्षेसाठी ७१३ केंद्रे निश्चित करण्यात आले आहेत.

राज्य शिक्षण मंडळाचे सर्व्हर डाऊन, कॉपीप्रकरणांची माहिती नाही
अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नियंत्रणात इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. शिक्षण मंडळाचे सर्व्हर डाऊन असल्याने १२ मार्च रोजी बीजगणिताच्या पेपरला कॉपीबहाद्दरांची संख्या कळू शकली नाही. ही स्थिती राज्यभरात होती, अशी माहिती आहे.
परीक्षा केंद्रावरून कॉपीप्रकरणांची माहिती आॅनलाइन पाठवावी लागते. त्याकरिता शिक्षण मंडळाचे स्वतंत्र संकेत स्थळ निश्चित केले आहे. मात्र, सर्व्हर डाऊन असल्याने एकही परीक्षा केंद्रावरून बीजगणिताच्या पेपरला कॉपीप्रकरणांची माहिती संकेत स्थळावर गुरुवारी सायंकाळपर्यंत मिळू शकली नव्हती.
अमरावती विभागात दहावीच्या परीक्षेसाठी ७१३ केंद्रे निश्चित करण्यात आले आहेत. विभागातून १ लाख ८८ हजार ६४ विद्यार्थी परीक्षेच्या सामोरे जात आहेत. दहावीच्या परीक्षेला ३ मार्चपासून प्रारंभ झाला. २३ मार्चपर्यंत ही परीक्षा होणार आहे.
तांत्रिक कारणांनी सर्व्हर डाऊन आहे. त्यामुळे गुरुवारी बीजगणित पेपरला कॉपीप्रकरणांची माहिती मिळू शकली नाही. ही माहिती राज्य मंडळाला कळविली आहे. सर्व्हर डाऊनचा फटका राज्यभरात बसला आहे.
- शरद गोसावी, अध्यक्ष, विभागीय शिक्षण मंडळ, अमरावती.