विद्यापीठात छत्रपती ‘शिवाजी महाराज विचारधारा’ सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 01:23 AM2018-04-20T01:23:08+5:302018-04-20T01:23:08+5:30

Start Chhatrapati Shivaji Maharaj's ideology at the university | विद्यापीठात छत्रपती ‘शिवाजी महाराज विचारधारा’ सुरू करा

विद्यापीठात छत्रपती ‘शिवाजी महाराज विचारधारा’ सुरू करा

Next
ठळक मुद्देशिवसेनेची मागणी : कुलगुरू चांदेकर यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात ‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची विचारधारा व व्यवस्थापन’ हा विषय सुरू करण्याची मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना मागणीचे निवेदन उपशहरप्रमुख अमोल निस्ताने यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
कुलगुरू चांदेकर यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनानुसार, विद्यापीठात संत गाडगेबाबा अध्यसन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र, स्वामी विवेकानंद स्टडीज सेंटर, बुद्धिस्ट स्टडीज सेंटर, महानुभाव पथ केंद्र, वुमेन स्टडी सेंटर, डॉ. पंजाबराव देशमुख अर्थव्यवस्था व नियमन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा केंद्र सुरू आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अठरापगड जातींना सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले. मोगलांच्या जाचातून महाराष्ट्राला मुक्त करून अटकेपार झेंडे रोवले. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा आणि सुराज्याचे व्यवस्थापन नव्या पिढीला कळावे, यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात त्यांच्या विचारधारेचे केंद्र स्थापन करणे काळाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, पराक्रम, किल्ल्यांचे संवर्धन, शिवकालीन पाणी साठवणनीती, युद्धकाळातील गनिमी कावे, रयतेचे राज्य, राज्यभिषेक, घोडदळ, पायदळ, तोफांचे संरक्षण, सर्वधर्मीयांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना आदी ऐतिहासिक बाबी नव्या पिढीला म्हणजेच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातून शिकता याव्यात, यासाठी महाराजांची विचारधारा आणि व्यवस्थापन विषय सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली. विद्यापीठ सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज व माँ जिजाऊ यांचे तैलचित्र लावावे, अशी मागणीदेखील केली आहे. निवेदन देतावेळी अमोल निस्ताने, मोहन क्षीरसागर, विजय खत्री, संजय देशमुख, राहुल काळे, दीपक काळे, प्रतीक डुकरे, सनी प्रगणे, मयूर देवरे, आकाश बनसोड, अंकुश वाघमारे, राजा बागडे संजय बुंदिले, राजू बुंदिले, उमेश गोगटे, रोहित ठाकूर, छोटू इंगोले आदी उपस्थित होते.

महापुरुषांची विचारधारा सुरू करण्यासंदर्भात नियमान्वये प्रक्रिया असून, त्यानुसार प्रवास करावा लागतो. शिवसेनेच्या मागणीनुसार प्राधिकरणापुढे हा विषय ठेवला जाईल. त्यानंतर पुढील मान्यतेसाठी शासनाकडे पाठवू. शिवाजी महाराजांची विचारधारा सुरू करण्यासाठी सकारात्मक पुढाकार घेतला जाईल.
- मुरलीधर चांदेकर
कुलगुरू, अमरावती विद्यापीठ.

Web Title: Start Chhatrapati Shivaji Maharaj's ideology at the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.