टायरअभावी १०८ रुग्णवाहिका उभ्या
By Admin | Updated: July 24, 2016 00:16 IST2016-07-24T00:16:10+5:302016-07-24T00:16:10+5:30
पावसाळ्यामध्ये मेळघाटातील आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचा आदेश कागदावरच थांबला असून....

टायरअभावी १०८ रुग्णवाहिका उभ्या
डॉक्टरांची पदे रिक्त : मेळघाटची आरोग्य यंत्रणा ‘व्हेंटीलेटरवर’
नरेंद्र जावरे परतवाडा
पावसाळ्यामध्ये मेळघाटातील आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचा आदेश कागदावरच थांबला असून रिक्त डॉक्टरांची पदे, १०८ क्रमांकाच्या रुग्णावाहिकेसह प्राथमिक आरोग्य केंद्राची वाहने टायरअभावी दोन महिन्यांपासून उभ्या असताना डिझेलसाठीसुद्धा ताटकळावे लागत आहे. त्यामुळे आदिवासी रुग्णांना जीवनदान देणारी आरोग्य यंत्रणाच व्हेंटीलेटरवर शेवटच्या घटका मोजत असल्याचे संतापजनक चित्र आहे.
चिखलदरा तालुक्यात पाच प्राथमिक आरोग्य केंद्र, ४० उपकेंद्र, तीन पी.एच.यू. केंद्र, दहा भरारी पथके, दोन ग्रामीण रुग्णालयांवर दीड लाखांवर नागरिकांच्या आरोग्याची मदार आहे.
सलोना, काटकुंभ, टेंब्रुसोंडा, सेमाडोह आणि हतरु येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. परंतु या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत समाविष्ट गावांची संख्या आरोग्य विभागालाच ताप आणणारी ठरली आहे. शंभर कि.मी. पर्यंत ये-जा करण्यासाठी रुग्ण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची मानसिकता ढासळत असल्याचे वास्तव आहे.
या दिवसात किमान चार महिने मेळघाटात बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ आदी डॉक्टरांची नियुक्ती करण्याचे आदेश वारंवार न्यायालयाने दिल्यावर काटकुंभ, हतरू, टेंब्रुसोंडासह पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रांत गट ‘अ’ श्रेणीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. बारुगव्हाण व पाचडोंगरी येथील भरारी पथक दीड महिन्यापासून डॉक्टरअभावी बंद आहे. येथील दोन्ही महिला डॉक्टरांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात आले. मात्र पर्यायी व्यवस्था सुद्धा करण्यात आली नाही, हे विशेष.
टायरअभावी वाहने उभी
मेळघाटातील आरोग्य यंत्रणा या ना त्या कारणाने सतत वादग्रस्त ठरत असल्याचे वास्तव आहे. मुंबईपासून मेळघाटात लक्ष ठेवले जात असल्याचे वारंवार सांगितले जाते. मात्र सर्वाधिक समस्यांच्या विळख्यात आरोग्य यंत्रणा सापडली आहे. महिनाभरापासून चुरणी येथील १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला टायर नाही. परिणामी रुग्णवाहिका उभी आहे. अती जलद सेवा म्हणून राज्य शासनातर्फे उपलब्ध करून दिल्यानंतरही देखभालीसाठी निधीच दिला नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वाहनांनासुद्धा टायर नसल्याने उभी असल्याचे चित्र काटकुंभ, सेमाडोह, हतरु प्राथमिक आरोग्य केंद्रात आहे. गंभीर रुग्णांना रेफर केल्यास दुसरी कुठलीच व्यवस्था नाही.
नवसंजीवनीच्या बैठकीचा फार्स
मेळघाटातील कुपोषणाचा गाजावाजा जगभर झाल्यानंतर विविध योजनांचे पीक येथे आले. त्यानंतरही आरोग्य, शिक्षण, वीज, पाणी, रस्ता, बसगाडी या सर्व मुलभूत गरजांसाठी आदिवासींना आंदोलनच करावे लागत आहे. ‘नवसंजीवनी’ बैठकीत या योजनांचा आढावा घेण्यात येतो. बैठक संपताच सर्व काही आॅलवेल असल्याचे चित्र आहे.
टायरअभावी रुग्णवाहिका उभी असून, रिक्त पदांवर वैद्यकीय अधिकारी नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे.
- सतीश प्रधान,
तालुका वैद्यकीय अधिकारी, चिखलदरा