अमरावती जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना मिळणार गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 13:37 IST2021-02-04T13:35:47+5:302021-02-04T13:37:24+5:30
Amravati News अमरावती जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती मिळणार आहे. त्याकरिता आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

अमरावती जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना मिळणार गती
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती मिळणार आहे. त्याकरिता आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. जलसंपदा विभागाच्या सिंचन भवनात गुरुवारी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जलसंपदा मंत्र्यांनी जलसंपदा विभागाचे सचिव संजय घाणेकर यांना व्हिडीओ कॉलवर जिल्ह्यातील प्रकल्पांना गती मिळण्यासाठी ज्या काही अडचणी असतील त्या तातडीने दूर करण्याच्या सूचनाही केल्या. यावेळी जलसंपदा मंत्र्यांनी निम्नपेढी, चंद्रभागा बॅरेज, वासनी, गर्गा, तसेच इतर लघु व मध्यम प्रकल्पांचा आढावा मुख्य अभियंता यांच्याकडून घेतला. भातकुली तालुक्यातील निम्नपेढी प्रकल्पांचा प्रश्न न्यायप्रविष्ठ असून, न्यायालयाने या प्रकल्पाला स्थगिती दिली आहे. चांगला वकील शासनाने नेमून न्यायालयाने दिलेले स्टे उठविण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी आमदार सुलभा खोडके यांनी यावेळी मंत्र्यांकडे केली. त्यावर चांगला वकील नेमण्याची कारवाई सुरू असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. चंद्रभागा बॅरेजच्या पुनर्वसनासाठी पाठपुरवा करण्याच्या सूचनाही सचिवांना यावेळी त्यांनी दिल्या. वासनी, चंद्रभागा प्रकल्पांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या प्रश्नासाठी गती वाढवा. अशा सूचनाही यावेळी मंत्री यांनी सचिवांना केल्या. यावेळी आमदार सुलभा खोडके, दयार्पूरचे आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते हर्षवर्धन देशमुख, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार मोहिते, मुख्य अभियंता अनिल बहादुरे, मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) आशिष देवगडे, अधीक्षक अभियंता रश्मी देशमुख, तसेच र्सव कार्यकारी अभियंता बैठकीला उपस्थित होते.
भुलेश्वरी नदीवर प्रकल्पाची मागणी
भुलेश्वरी नदीवर नव्याने मध्यप्र प्रकल्प करण्यात यावे, अशी मागणी दयार्पूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे केली. मात्र मध्यम प्रकल्पाऐवजी लघु प्रकल्प होऊू शकतो. उपलब्ध पाण्यानुसार आखणी करावी, अशी सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच कालाडोह प्रकल्पांच्या ठिकाणी पर्यटन विकास करा, वासनी प्रकल्पांची उंची वाढविण्याची मागणी यावेळी आमदार वानखडे यांनी केली.
कोहळ व सोनगाव शिवणगाव प्रकल्पाचा कालवा कार्यान्वित करा
चांदूररेल्वे तालुक्यातील कोहळ व सोनगाव शिवणी लघु प्रकल्पाच्या कालवा कार्यान्वित करा, अशी मागणी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी केली. सदर कालव्यांचे ट्रायल घेण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना मंत्र्यांनी दिल्या.