एसटी खडयात;आठ गावांच्या फेऱ्या बंद; अनेक मार्ग बदलले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:17 IST2021-09-08T04:17:29+5:302021-09-08T04:17:29+5:30

ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण : एसटीच्या सुट्या भागांचे होतेय नुकसान अमरावती : पावसामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची प्रचंड दुर्दशा ...

ST Khadyat; rounds of eight villages closed; Many ways changed! | एसटी खडयात;आठ गावांच्या फेऱ्या बंद; अनेक मार्ग बदलले !

एसटी खडयात;आठ गावांच्या फेऱ्या बंद; अनेक मार्ग बदलले !

ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण : एसटीच्या सुट्या भागांचे होतेय नुकसान

अमरावती : पावसामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झालेली आहे. याचा फटका एसटी महामंडळालाही बसत आहे. परिणामी, महामंडळाने दुर्लक्षित रस्त्यांमुळे अनेक गावांची वाहतूक बंद केली आहे. अनेक ठिकाणी इतर मार्गाने वळविली आहे. यात एसटीचा देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढला आहे.

दीड वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी तब्बल पाच महिने एसटीची बसेस बंद होत्या. यावर्षीही मार्च महिन्यापासून कोरोनाने कहर केल्याने ४५ दिवस लॉकडाऊनमुळे एसटीची चाके थांबली होती. या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील या कालावधीत एसटीचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडाले. अनलॉकनंतर एसटीची वाहतूक पूर्णक्षमतेने सुरू झाली आहे. जिल्ह्यात अमरावती, दर्यापूर, परतवाडा, चांदूर बाजार, मोर्शी, वरूड, चांदूर रेल्वे, बडनेरा असे ८ आगार असून एकूण ३५० हून अधिक बसेस आहेत. यापैकी २५० बस धावत आहेत. मात्र, पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. या रस्त्यावरून एसटी धावत असताना स्प्रिंग पट्टे व इतर सुट्या भागांचे नुकसान होत असल्याने दुरुस्तीवर महामंडळाचा लाखो रुपयांचा खर्च होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ८ ते १० मार्गावरील फेऱ्या बंद, तर अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरू असल्याने त्या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे.

बॉक्स

एसटीचा खर्च वाढला

पावसाळ्यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था होते. त्यामुळे एसटीच्या सुट्या भागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. स्प्रिंग पट्टे तुटणे, क्लच प्लेट्स निकामी होणे या अन्य कारणांवरून एसटी मधेच नादुरुस्त होत असल्याने मेंटेनन्सवर महामंडळाचा लाखो रुपयांचा खर्च होत आहे. आधीच तोट्यात असलेल्या एसटीला अधिकचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

बॉक्स

हे मार्ग वळविले

अमरावती यवतमाळ मार्ग नेर, दर्यापूर, अकोट मार्गे येवदा, परतवाडा- भांडुम मार्ग खामला, कोकरू, अमरावती दर्यापूर मार्गे भातकुली - आमला या ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटीचेही मार्ग वळविण्यात आले आहेत.

बॉक्स

या मार्गावरील फेऱ्या बंद

चिखलदरा तालुक्यातील भांंडूम, सेमाडोह, रायपुर, मार्गे हतरू, रूईपठार या फेऱ्या रस्ते खराब असल्याने बंद आहेत.

बॉक्स

आगार आणि सुरू बसेस संख्या

अमरावती- ५०

बडनेरा -३५

परतवाडा -४६

वरूड-३८

चांदूर रेल्वे-३०

दर्यापूर-४०

चांदूर बाजार-३२

कोट

पावसाळ्यात ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा होते. यात एसटीच्या सुट्या भागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. एसटी मधेच नादुरुस्त झाल्यास प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. एसटीच्या सुट्या भागाचे नुकसान झाल्यास अपघाताचीही शक्यता असते. याकरिता पावसाळ्यात नादुरूस्त मार्गावरील फेऱ्या तात्पुरत्या स्वरूपात बंद केल्या जातात.

- श्रीकांत गभणे,

विभाग नियंत्रक, अमरावती

Web Title: ST Khadyat; rounds of eight villages closed; Many ways changed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.