कॉम्प्युटरला स्पायवेअरचा विळखा

By Admin | Updated: July 10, 2014 23:21 IST2014-07-10T23:21:49+5:302014-07-10T23:21:49+5:30

आजकाल कॉम्प्युटर व्हायरसपेक्षा स्पायवेअरचा धोका खूप वाढला आहे. स्पायवेअर हे कॉम्प्युटर प्रोग्रॅम जेम्स बाँडच्या कार्यपद्धतीचे कॉम्प्युटर रूप होय. काही ई-मेल उघडल्यावर लगेचच

Spyware is detected by the computer | कॉम्प्युटरला स्पायवेअरचा विळखा

कॉम्प्युटरला स्पायवेअरचा विळखा

खासगी माहितीची चोरी शक्य : व्हायरसपेक्षा अधिक भयंकर शत्रू
अमरावती : आजकाल कॉम्प्युटर व्हायरसपेक्षा स्पायवेअरचा धोका खूप वाढला आहे. स्पायवेअर हे कॉम्प्युटर प्रोग्रॅम जेम्स बाँडच्या कार्यपद्धतीचे कॉम्प्युटर रूप होय. काही ई-मेल उघडल्यावर लगेचच तुमच्या कॉम्प्युटरमध्ये स्पायवेअर शिरू शकते. विविध प्रकारांनी स्पायवेअर नकळत तुमच्या कॉम्प्युटरमध्ये शिरतात आणि तुम्ही कॉम्प्युटरवर काय करता याची पूर्ण खबरबात ठेवतात. तुमची खासगी माहिती, काय पासवर्ड टाईप केला, कुठले प्रोग्रॅम वापरले, कुठल्या वेबसाईट्सना भेटी दिल्यात ही माहिती स्पायवेअरच्या साह्याने सायबर चोरांच्या हाती लागू शकते. काही प्रकारचे स्पायवेअर तर भयंकर धोकादायक आहेत. कॉम्प्युटर प्रोग्रॅम तुमच्या कॉम्प्युटरमध्ये कायमस्वरूपी टाकू शकतात. त्याने तुमचा कॉम्प्युटरचा स्पीड कमी होऊ शकतो, तर कधी कधी तुमच्या कॉम्प्युटरचा पूर्ण ताबा पण जाऊ शकतो. काही स्पायवेअर हे इतक्या खुबीने स्वत:ला लपवतात की त्यांना शोधणे व काढणे मुश्कील होऊन बसते.
तरुण वर्गात चॅट करण्याची पद्धत फारच रुजली आहे. सायबर चोर तुमच्याशी दोस्ती वाढवून तुमचा पासवर्ड व इतर खासगी माहिती मिळवू शकतात. तुम्ही चॅटवर टाईप केलेला कुठलाही मजकूर त्यावेळी इंटरनेटवर असणाऱ्या सर्व प्रयत्नशील व्यक्तींना कळू शकतो. म्हणूनच कॉम्प्युटर सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही महत्त्वाची माहिती चॅट करताना टाईप करू नका. उदाहरणार्थ क्रेडिट कार्ड नंबर, डेबिट कार्ड नंबर, तुमची जन्मतारीख इत्यादी.
तुम्ही जर चॅट करताना मायक्रोफोन व वेब कॅमेरा वापरत असाल तर त्यामार्फत तुम्हाला नकळत तुमच्या हालचाली, फोनवरची बातचीत, तुम्ही की बोर्डवरची कुठली बटने दाबलीत हे सायबर चोर थोड्या प्रयत्नांती समजू शकतो व त्या माहितीचा उपयोग करून तुमचा पासवर्ड पण चोरला जाऊ शकतो. यावर सोपा उपाय म्हणून मायक्रोफोन व वेब कॅमेरा काम झाल्यावर बंद करा किंवा झाकून ठेवा.
आॅनलाईन क्राईममध्ये वाढ
इंटरनेटवरचे भामटे लोकांना भुलवणारा ई-मेल पाठवतात. 'तुमच्या इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड एका हल्लेखोराने मिळवला आहे. त्यामुळे निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी लगेच तुमचा पासवर्ड बदला..' असे लिहिलेले असते. त्यासाठी या ई-मेलमध्ये एक 'लिंक' दिलेली असते. त्या लिंकवर आपल्या संगणकाचा माऊस नेऊन त्यावर क्लिक केले की, आपल्यासमोर आपल्या बँकेची वेबसाईट उघडली जाते, असे आपल्याला वाटते. खरे म्हणजे ही आपल्या बँकेची वेबसाईट नसतेच मुळी. ती तर त्या भामट्याने तयार केलेली स्वत:ची वेबसाईट असते. पण ती हुबेहूब आपल्या बँकेच्या वेबसाईटसारखी दिसत असल्यामुळे आपल्याला ती आपल्या बँकेचीच वाटते! तिथे 'तुमचा पासवर्ड बदलण्यासाठी सध्याचा पासवर्ड भरा' वगैरे गोष्टी लिहिलेल्या असतात. आपण गुपचूप ही माहिती भरतो आणि आपल्याला जो नवीन, बदललेला पासवर्ड हवा आहे तोही तिथे टाईप करतो. मग पासवर्ड बदलल्यामुळे आता सगळे ठीकठाक आहे, वगैरे गोष्टी आपल्याला आपल्या संगणकाच्या पडद्यावर दिसतात आणि आपल्याला हायसे वाटते.
भामट्याने हा ई-मेल आपल्याला स्वत:च आपल्या बँकेच्या नावाने पाठवलेला असतो. मग तो भामटा ही माहिती वापरून स्वत: आपल्या बँकेच्या वेबसाईटवर जातो आणि तिथे आपल्याकडून मिळवलेला आपला खरा युजर आयडी व पासवर्ड वापरून आपल्या खात्यातील सगळे पैसे स्वत:च्या खात्यात वळवितो.

Web Title: Spyware is detected by the computer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.