महाविकास आघाडी, किसान समन्वय समितीच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:35 IST2020-12-11T04:35:08+5:302020-12-11T04:35:08+5:30
अमरावती : केंद्रातील भाजप सरकारने शेतकरी, कामगारांच्या हिताला बाधा आणणारे कायदे पारित केले, ते रद्द करण्यात यावे, या प्रमुख ...

महाविकास आघाडी, किसान समन्वय समितीच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
अमरावती : केंद्रातील भाजप सरकारने शेतकरी, कामगारांच्या हिताला बाधा आणणारे कायदे पारित केले, ते रद्द करण्यात यावे, या प्रमुख मागणीसोबत दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ८ डिसेंबर रोजी पुकारलेला भारत बंद शहरासह जिल्ह्यात महाविकास आघाडी, किसान समन्वय समितीने आयोजित केला. या बंदला जिल्हाभरात उत्स्फूृर्त प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून सहकार्य केले.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविराेधात १२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब व हरियाणातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एक दिवसाची भारत बंदची हाक देण्यात आली होती. त्याला मंगळवारी प्रत्येक घटकांकडून पाठिंबा मिळाला. जिल्ह्यात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, किसान समन्वय समिती, वंचित बहुजन आघाडी, प्रहार आदी राजकीय पक्षांसह विविध संघटनांनी बंदमध्ये सहभाग घेतला.
राजकमल चौक येथे सकाळी ९ वाजता एकत्र येत केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी मोदी सरकारविरोधात केलेल्या तीव्र घोषणाबाजी केली. सकाळी दहा वाजता गांधी चौक, इतवारा बाजार, जवाहर रोड, जयस्तंभ चौक आदी प्रमुख मार्गाने पायदळ रॅली काढत प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. आवाहनाला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. ही रॅली इर्विन चौकात पाेहोताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हारार्पण करून अभिवादन केले. यावेळी केंद्र सरकारचे तीनही कृषी कायदे कसे अन्यायकारक आहेत, याचा पाढा उपस्थितांसमोर वाचला. जोपर्यंत मोदी सरकार शेतकरीविराेधी कायदे रद्द करणार नाही, तोवर लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला.
आंदोलनात आमदार सुलभा खोडके, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष किशोर बोरकर, माजी खासदार अनंत गुढे, बबलू शेखावत, विलास इंगोले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे, पराग गुळदे,ज्ञानेश्वर धाने पाटील, राष्ट्रवादीच्या सुरेखा ठाकरे, जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, राजेंद्र महल्ले, संगीता ठाकरे, नाना नागमोते, भारत चौधरी, हरिभाऊ मोहोड, शरद देवरणकर, अनिल ठाकरे, बच्चू बोबडे, बी.आर. देशमुख, अजिज पटेल, बाळा सावरकर, किसान समन्वय समितीचे अशोक सोनारकर, चंद्रकात बानुबाकोडे, सुनील घटाळे, जे.एम. कोठारी, सुभाष पांडे, वंचित बहुजन आघाडीचे अलीम पटेल, सिद्धार्थ गायकवाड, सचिन रहाटे, रिना नंदा, अविनाश माडीकर, नाना बोंडे, संतोष महात्मे, गणेश रॉय, प्रफुल्ल राऊत, सुनील राऊत, सुरेश रतावा, पंजाबराव तायवाडे, दिगंबर मानकर, उमेश घुरडे, गोपाल राणे, गणेश खारकर, भास्कर ठाकरे,किशोर शेळके यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.
बॉक्स
बाजारपेठ शुकशुकाट
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व बंदला समर्थनासाठी शहराच्या प्रमुख मार्गावरील बहुतांश प्रतिष्ठाने बंद होते. मात्र, अंतर्गत भागातील किरकोळ दुकाने उघडी होती. सकाळपासूनच शहरातील बहुतांश ऑटोरिक्षा सेवा बंद होती. याशिवाय राज्य परिवहन महामंडळाची एसटी बससेवा बंद ठेवण्यात आली होती. विशेष म्हणजे, बंदसाठी काढण्यात आलेल्या रॅलीत काही व्यापारीसुद्धा सहभागी झाले होते.
बॉक्स
बाजार समितीत शुकशुकाट
स्थानिक कृषिउत्पत्न बाजार समिती बंदला समर्थन देण्यासाठी मंगळवारी बंद ठेवण्यात आली होती. जि्ल्हाभरातील बाजार समित्याही बंद होत्या. परिणामी कुठलेही व्यवहार होऊ शकले नाहीत.