अमरावतीत कृषकांच्या समर्थनासाठी पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:32 IST2020-12-11T04:32:16+5:302020-12-11T04:32:16+5:30
विविध संघटना, राजकीय पक्षांचा सहभाग, व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवली प्रतिष्ठाने अमरावती : केंद्र सरकारच्या शेतकरी-कामगारविरोधी धोरणाला विरोध व दिल्लीतील ...

अमरावतीत कृषकांच्या समर्थनासाठी पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
विविध संघटना, राजकीय पक्षांचा सहभाग, व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवली प्रतिष्ठाने
अमरावती : केंद्र सरकारच्या शेतकरी-कामगारविरोधी धोरणाला विरोध व दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ८ डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला अमरावती जिल्ह्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच किसान संघर्ष समन्वय समिती, वंचित बहुजन आघाडीसह विविध संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. व्यापाऱ्यांनीही प्रतिष्ठाने बंद ठेवली.
शहरातील राजकमल चौक येथे सकाळी ९ वाजता महाविकास आघाडीचे नेते एकत्र आलेत. यानंतर राजकमल चौक, गांधी चौक, इतवारा बाजार, जवाहर रोड, जयस्तंभ चौकातून रॅली काढण्यात आली. नेत्यांच्या आवाहनाला अनुसरून व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून आंदोलनाला भरभरून प्रतिसाद दिला.
बंद समर्थकांची रॅली ही जयस्तंभ चौकात पोहोचताच महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हारार्पण करण्यात आले. इर्विन चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण केल्यानंतर या ठिकाणी केंद्रातील मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मार्गदर्शन केले व या नवीन कृषिकायद्यांचा समाचार घेतला.
आंदोलनात आमदार सुलभा खोडके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष किशोर बोरकर, शिवसेनेचे माजी खासदार अनंत गुढे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखा ठाकरे, जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, मनपाचे विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, अशोक सोनारकर यांच्यासह महाविकास आघाडीसह अन्य पक्षांचे तसेच संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.