२९ शिक्षकांच्या वेतनावर १८ लाख रुपयांचा खर्च
By Admin | Updated: December 21, 2015 00:17 IST2015-12-21T00:17:54+5:302015-12-21T00:17:54+5:30
तत्कालीन अचलपूर जिल्ह्यातून वरुडची पहिली सरकारी प्राथमिक शाळा ७ जुलै १८६२ ला बी.के.आय मराठी स्कूल या नावाने स्थापन झाली.

२९ शिक्षकांच्या वेतनावर १८ लाख रुपयांचा खर्च
स्पर्धेचा काळ : नगरपरिषद मराठी शाळा आॅक्सिजनवर
संजय खासबागे वरूड
तत्कालीन अचलपूर जिल्ह्यातून वरुडची पहिली सरकारी प्राथमिक शाळा ७ जुलै १८६२ ला बी.के.आय मराठी स्कूल या नावाने स्थापन झाली. पुुढे ती नगरपरिषदेच्या अख्त्यारित सुरू होती. येथे विद्यार्थी चवथीपर्यंत शिक्षण घेत आहेत. परंतु ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नगरपरिषद शाळांना स्पर्धेच्या युगात पटसंख्येअभावी टिकाव धरणे कठीण झाले आहे. नगर पालिकेच्या अख्त्यारितील उर्दू शाळेत ९५८ विद्यार्थी असून २९ शिक्षक सेवा देत असून शिक्षकांच्या वेतनावर १८ लाख रुपयांचा खर्च होत आहे.
वरुडची पहिली सरकारी प्राथमिक शाळा ७ जुलैै १८६२ ला बी.के.आय मराठी स्कूल या नावाने स्थापन झाली. जन्मताच सरकारमान्य असल्याने नागपूरच्या ब्रिटिश शासनाच्या कार्यालयात अडीच रुपये पगारावर काम करणारा १८ वर्षे वयाचा लिपिक पशुराम बल्लाळ यांची तेथून पदोन्नतीवर बदली करून ४० रुपये प्रतिमाह वेतनावर फर्स्ट असिस्टंटचा दर्जा देऊन वरुडच्या सरकारी प्राथमिक शाळेवर पाठविण्यात आले होते. त्यांच्या हस्ते शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. तेव्हा पहिला विद्यार्थी म्हणून लक्ष्मण माधव पाटील यांचे नाव दाखल रजिस्टरवर नोंदविले गेले. भरतीनुसार १८६२ मध्ये २ विद्यार्थी, १८६३ मध्ये ८ विद्यार्थी, १८६४ मध्ये ११ विद्यार्थी, १८६५ मध्ये २३ विद्यार्थी, १८६६ मध्ये आणि ६७ मध्ये ७६ विद्यार्थी दाखल होते. सन १ एप्रिल १९७८ पर्यंत सतत १४ वर्र्षेे ही शाळा इंग्रजीत होती. येथील शिक्षकाचे वेतनसुध्दा वरुडच्या तहसील कार्यालयातून निघत होते. परंतु नगरपरिषद मराठी शाळा क्र. १ आणि २ ला विद्यार्थी पटसंख्येअभावी अखेरची घरघर लागली आहे. शहरात उच्चभ्रू शाळांनी आक्रमण केल्याने पालक देणगी देऊन खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दाखल करतात. यामुळे पटसंख्या दिवसागणिक रोडावत आहे. शहरातील नगरपरिषद मराठी शाळा क्र. १ मध्ये २०८, शाळा क्र २ मध्ये १६२, न.प.सावता विद्यामंदिरात ४४, न.प.जवाहर विद्यामंदिरात २०२, न.प.उर्दू प्राथमिक शाळेत २६७, न.प.उच्च प्राथमिक शाळेत ७५ अशी पटसंख्या आहे. एकूण २९ मुख्याध्यापक, शिक्षक कार्यरत आहेत. चार मुख्याध्यापकांमध्ये दोन पात्र मुख्याध्यापक आहेत. या शिक्षकांच्या वेतनावर मासिक १८ लाख रुपये खर्च होत आहे. वेतनाच्या तुलनेत प्रत्येक विद्यार्थ्यामागे एक हजार ८७८ रुपये खर्च होत आहे. विद्यार्थी पटसंख्येच्या तुलनेत शिक्षकांची नेमणूक केली जाते. शहरात खासगी प्राथमिक शाळांना परवानगी दिल्याने याचा परिणाम नगरपरिषद मराठी, शाळांवर झाला आहे. नगरपरिषद शाळांना उभारी मिळाली पाहिजे म्हणून इंग्रजी माध्यमांचे कॉन्व्हेंट सुरू करण्यात आले असून याचा पहिल्या वर्गातील पटसंख्येसाठी २० ते २५ टक्के लाभ मिळत असल्याचे सांगण्यात येते.
शहरात प्राथमिक शिक्षण देणाऱ्या मराठी, इंग्रजी शाळांची संख्या अधिक असल्याने नगरपरिषदेच्या शाळांवर याचा परिणाम झाला आहे. इंग्रजी शाळा सुरू झाल्यास दाखल संख्या वाढू शकते. न.प. सावता विद्यामंदिर मराठी शाळा मिळावी म्हणून एका खासगी इंग्रजी शाळेच्या संचालकांनी प्रस्ताव पाठविला आहे.
- सुरेश वाघमारे,
प्रशासन अधिकारी, नगरपरिषद.
येथील दीडशे वर्ष जुन्या मराठी शाळेचे इंग्रजी शाळेत रुपांतर करून देखभाल दुरुस्ती, विद्यार्थ्यांसाठी डेक्स बेंच तसेच अत्याधुनिक सुविधा देऊन मराठी शाळा सुसज्ज करण्याचा प्रयत्न आहे. तसा ठराव नगरपरिषदेच्यावतीने घेण्यात आला आहे. गोरगरिबांच्या मुलांना उच्चशिक्षण मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- रवींद्र थोरात, नगराध्यक्ष.