भरधाव कारची ऑटोला धडक; सात जखमी; बिझिलँडजवळील घटना
By प्रदीप भाकरे | Updated: November 16, 2022 17:10 IST2022-11-16T17:07:03+5:302022-11-16T17:10:54+5:30
या धडकेत ऑटो दोनदा उलटला

भरधाव कारची ऑटोला धडक; सात जखमी; बिझिलँडजवळील घटना
अमरावती : नागपूरहून भरधाव येणाऱ्या कारने ऑटोला धडक दिल्याने ऑटोमधील सहा प्रवाशांसह ऑटोचालक गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास बिझिलँड प्रवेशद्वारासमोर घडली. जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अकोला येथील गेडाम परिवारातील सदस्य कापड खरेदी करण्यासाठी अमरावतीहून ऑटो (एम.एच.२७,पी.५७३३) ने बिझिलँड येथे जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान ऑटो चालक महामार्गावरून वळण घेत असतांना नागपूरकडून येणाऱ्या भरधाव कारने (एम.एच.४०ए.सी २८८२) ऑटोला धडक दिली. या धडकेमुळे ऑटो दोनदा उलटला.
यामध्ये नितीन वाघमारे (३६, अकोला), राहुल फुलझेले (३५, वाळकी जि. यवतमाळ), शैलेश गेडाम (३४, अकोला),चैताली गेडाम (३२, अकोला), सुरेखा गेडाम (६०, अकोला),बापूराव कोकाटे (५५, इर्विन वसाहत अमरावती), नरेश नितनवरे (४८, बेलपुरा, अमरावती) हे सातजण जखमी झाले.
माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलिसांनी घटनास्थळावर तातडीने धाव घेतली. जखमींना रुग्णवाहिकाद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आरोपी कारचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास नांदगाव पेठचे ठाणेदार प्रवीण काळे करीत आहेत.