अध्यक्षपदाच्या निवडीसाठी बैठकींना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:01 IST2019-12-23T05:00:00+5:302019-12-23T05:01:24+5:30
मागील काही दिवसांपासून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामुळे आमदारांना वेळ नसल्याने जिल्हा परिषदेच्या राजकीय हालचाली थंडावल्या होत्या. आता मात्र अधिवेशन संपल्यामुळे झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याकरिता लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षही कामाला लागले आहेत.

अध्यक्षपदाच्या निवडीसाठी बैठकींना वेग
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी समविचारी राजकीय लोकप्रतिनिधींकडून बैठका सुरू झाल्या आहेत. येत्या नवीन वर्षात म्हणजेच जानेवारीच्या पहिल्याच आठवडयात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे. निवड कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला तरी राजकीय पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. नवीन अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने गोपनीय बैठकी सुरू झाल्या आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेतील विद्यमान सत्ताधारी काँग्रेस पक्षासोबतच विरोधी पक्ष असलेल्या भाजपनेही सहकारी पक्षाच्या मदतीने सत्ता मिळविण्यासाठी राजकीय तडजोडीचे आराखडे बांधणे सुरू केल्याचे चित्र आहे.
मागील काही दिवसांपासून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामुळे आमदारांना वेळ नसल्याने जिल्हा परिषदेच्या राजकीय हालचाली थंडावल्या होत्या. आता मात्र अधिवेशन संपल्यामुळे झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याकरिता लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षही कामाला लागले आहेत.
या निवडीसाठी आता कमी दिवसांचा कालावधी असल्याने काही जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी आमदारांची भूमिका महत्त्वाची असल्याने आमदारांसोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येतो. त्यानुसार पक्ष नेत्यासोबतच चर्चा सुरू असून त्यानुसार जिल्हा परिषदेची सत्ता मिळविण्यासाठी काँग्रेससह विरोधी पक्ष असलेल्या भाजपानेही कंबर कसली आहे.
हिवाळी अधिवेशन आटोपल्याने जिल्हा परिषदेच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्या अनुषंगाने विद्यमान सत्ताधारी पक्ष असलेल्या काँग्रेसने राजकीय हालचाली वढविल्या आहेत. सत्तास्थापनेसाठी लागणारे पुरेसे संख्याबळ जुळविण्यासाठी समविचारी पक्षासोबत पक्षाचे नेते चर्चा करीत आहेत. यासाठी बैठकही घेण्यात येत आहेत.
दुसरीकडे विरोधीपक्ष असलेल्या भाजपनेही काँग्रेसकडील सत्ता खेचण्यासाठी राजकीय व्यूहरचना आखणे सुरू केले आहे. त्याअनुषंगाने नुकतीच जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचीही समविचारी पक्षासोबत बैठक घेण्यात आली. त्यामुळे येत्या काळात जिल्हा परिषदेचे राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
मॅजिक फिगरसाठी चढाओढ
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक काही दिवसात होऊ होणार आहे. जिल्हा परिषद सभागृहाची सदस्य संख्या ही ५९ आहे. त्यापैकी दोन जागा रिक्त असल्यामुळे सद्यस्थितीत सभागृहात ५७ सदस्य संख्या आहे. पुढील कालावधीसाठी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड करताना बहुमताच्या मॅजिक फिगरसाठी २९ सदस्य संख्या असणे अनिवार्य आहे.