विशेष रेल्वेगाड्या जूनपर्यंत पूर्ववत, रेल्वे बोर्डाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:14 IST2021-03-17T04:14:58+5:302021-03-17T04:14:58+5:30
अमरावती : कोरोनाच्या काळात ‘लॉकडाऊन’मध्ये प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता, रेल्वे बोर्डाने काही विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला ...

विशेष रेल्वेगाड्या जूनपर्यंत पूर्ववत, रेल्वे बोर्डाचे आदेश
अमरावती : कोरोनाच्या काळात ‘लॉकडाऊन’मध्ये प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता, रेल्वे बोर्डाने काही विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या विशेष रेल्वे गाड्या जून २०२१ पर्यंत धावतील, असे आदेश रेल्वे बोर्डाने १५ मार्च रोजी निर्गमित केले. रेल्वे प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
कोरोनाकाळात रेल्वे प्रशासनाने कोविड मालवाहू पार्सल व्हॅन ९ एप्रिल २०२० पासून सुरू केली होती. प्रवासी रेल्वे गाड्या १५ मे २०२० पासून सुरू केल्या होत्या. प्रारंभी मोजक्याच रेल्वे सुरू होत्या. कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेऊन रेल्वे बोर्डाने टप्प्याटप्प्याने तीन महिने मुदतवाढ देत प्रवाशांना सेवा पुरविली. १५ मार्च २०२१ पर्यंत पार्सल व्हॅन, लांब पल्ल्याच्या गाड्यांना मुदतवाढ होती. आता ती वाढवून १५ जून २०२१ करण्यात आली आहे.
--------------
बडनेरा, अमरावती येथून नियमित गाड्या सुरू
बडनेरा, अमरावती रेल्वे स्थानकावर वेळापत्रकानुसार नियमित धावणाऱ्या गाड्या निरंतर सुरु राहतील, असे रेल्वे बोर्डाचे आदेश आहेत. अमरावती-मुंबई, अमरावती-तिरूपती, अमरावती-सुरत एक्स्प्रेस वेळापत्रकानुसार धावतील. बडनेरा रेल्वे स्थानकावरून हावडा-मुंबई मेल, एक्स्प्रेस, गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस, अहमदाबाद-चेन्नई नवजीवन एक्स्प्रेस, ओखापुरी-द्वारकानाथ एक्स्प्रेस, मुंबई-हावडा गितांजली एक्स्प्रेस, अहदाबाद-हावडा एक्स्प्रेस, पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्सप्रेस आदी रेल्वे गाड्या वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहेत.