‘स्मार्ट व्हिलेज’ची प्रमाणपत्रावर बोळवण
By Admin | Updated: May 5, 2017 00:10 IST2017-05-05T00:10:22+5:302017-05-05T00:10:22+5:30
स्मार्ट ग्राम योजनेच्या तालुका आणि जिल्हास्तरीय बक्षीस वितरणासाठी शासनाकडून निधीच प्राप्त न झाल्यामुळे पारितोषिक वितरणाच्या ...

‘स्मार्ट व्हिलेज’ची प्रमाणपत्रावर बोळवण
मुहूर्ताला केवळ प्रमाणपत्रांचेच वाटप : पारितोषिकांसाठी रक्कमच नाही
जितेंद्र दखने अमरावती
स्मार्ट ग्राम योजनेच्या तालुका आणि जिल्हास्तरीय बक्षीस वितरणासाठी शासनाकडून निधीच प्राप्त न झाल्यामुळे पारितोषिक वितरणाच्या मुहूर्ताच्या दिवशी म्हणजे १ मे या महाराष्ट्रदिनी केवळ प्रमाणपत्र वितरित करून वेळ मारून नेण्यात आली. विशेष म्हणजे अद्यापही शासनाकडून पारितोषिकाची रक्कम जिल्हा परिषदेला उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे प्रमाणपत्र देऊनच स्मार्ट व्हिलेजच्या पदाधिकाऱ्यांनी बोळवण करण्यात आली आहे. स्मार्ट व्हिलेजसाठी राज्यात १०४ कोटींची गरज असताना त्यातील केवळ १० कोटी ५६ लाख रुपयेच शासनाने दिले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींवर केवळ प्रमाणपत्रावर समाधान मानण्याचा प्रसंग ओढवलाआहे.
स्मार्ट ग्राम योजनेची सुरूवात डिसेंबर २०१६ पासून झाली. त्यासाठी योजनेच्या निकषानुसार तालुका स्तरावर समितीने तपासणीआधीच केली. त्यासमितीच्या अहवालावरून निवड झालेल्या ग्रामपंचायतींना २५ टक्के गुणांकन करण्यात आले. प्रसिद्धीनंतर कोणाचाही आक्षेप न आल्याने तालुकास्तरावर प्रथम गावांची निवड करण्यात आली. त्यागावांना प्रजाकसत्ताकदिनी पारितोषिक वितरण करण्याचे प्रस्तावित होते. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे आचारसंहितेमुळे हा मुहूर्त लांबणीवर पडला होता. त्यानंतर जिल्हास्तरीय गावांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच १ मे महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम पारितोषिक वितरणासाठीचा मुहूर्त साधला गेला. याकार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते ग्रामपंचायतींना धनादेशासह प्रमाणपत्र वितरणाचे शासनाने आधीच सुचविले होते. मात्र, त्यासाठी निधीच उपलब्ध झाला नाही.