आश्वासनावर शेतकऱ्यांची बोळवण
By Admin | Updated: July 26, 2014 23:52 IST2014-07-26T23:52:34+5:302014-07-26T23:52:34+5:30
जिल्ह्यातील २०० च्या वर शेतकऱ्यांचे सोयाबीन व कपाशी बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी तालुकास्तरीय समिती व जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांकडे दाखल आहेत. याविषयीचे पंचनामे युद्धस्तरावर सुरू आहेत.

आश्वासनावर शेतकऱ्यांची बोळवण
बियाणे उगवले नसल्याच्या २०० च्यावर तक्रारी : कोण देणार मोफत बियाणे? कृषी विभाग अनभिज्ञ
गजानन मोहोड - अमरावती
जिल्ह्यातील २०० च्या वर शेतकऱ्यांचे सोयाबीन व कपाशी बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी तालुकास्तरीय समिती व जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांकडे दाखल आहेत. याविषयीचे पंचनामे युद्धस्तरावर सुरू आहेत. निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यासाठी शेतकऱ्यांना मोफत बियाणे देण्याचे आश्वासन कृषिमंत्र्यांनी देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली. प्रत्यक्षात हे मोफत बियाणे शेतकऱ्यांना कोण पुरविणार? याविषयी जिल्हा परिषदेचा कृषी विभाग अनभिज्ञ आहे.
दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यानंतर आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना आशा दाखविली. मात्र बाजारात विक्रीसाठी असणाऱ्या महाबीजसह नामांकित कंपन्याच्या बियाण्यांची उगवणशक्ती कमी असल्याने पेरलेले बियाणे उगवलेच नाहीत. मूग व उडदाचा कालावधी संपल्याने शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन पेरणीला पसंती दिली. सद्यस्थितीत जिल्ह्यात २ लाख ५० हजार ९०० हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली. पेरणीसाठी ट्रॅक्टर, मजुरी, बियाणे व खते असा एकरी १० हजारांच्यावर खर्च शेतकऱ्यांनी केला. जिल्ह्यात २५ हजार हेक्टर क्षेत्रामधील बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या क्षेत्रावर दुबार पेरणीचे सावट आहे. तक्रारींचे निवारण करण्यासाठी उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे. ही समिती शेतांचे पंचनामे करीत आहे. या फसगत झालेल्या शेतकऱ्यांना मोफत बियाणे देण्याची घोषणा कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अमरावती येथे केली. शेतकऱ्यांना मोफत बियाणे मिळालेले नाहीत. कृषी विभाग केवळ आश्वासनावर शेतकऱ्यांची बोळवण करीत आहे.
मोफत बियाण्यांचा संभ्रम कायम
शेतकऱ्यांनी पेरणी केलेले बियाणे निघालेच नाही, अशा शेतकऱ्यांना मोफत बियाणे देण्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अमरावती येथे २१ जुलै रोजी केली. मात्र हे मोफत बियाणे कोण देणार? याविषयीची माहिती कृषी विभागाला नाही. याविषयी अद्याप संभ्रम कायम आहे.
महाबीज ३३५ या वाणांच्या तक्रारी
पूर्णानगर येथील शेतकऱ्यांनी गावातील सुमित कृषी सेवा केंद्रातून महाबीज कंपनीचे ३३५ हे बियाणे खरेदी केले. पेरणीपश्चात आठ, दहा दिवसांचा कालावधी ओलांडला असताना बियाणे उगवलेच नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या आहेत.