चिमण्यांनो,परत फिरा रे, जाहल्या तिन्ही सांजा
By Admin | Updated: October 21, 2014 22:43 IST2014-10-21T22:43:00+5:302014-10-21T22:43:00+5:30
ज्यांच्या आयुष्यात या जन्मदात्यांनी प्रकाश आणण्याचा प्रयत्न केला, त्यांचे जीवन तेजोमय केले़, अशा कुटुंंबातील कुलदीपक या जन्मदात्यांना विसरले आहेत़ आयुष्याच्या संध्याकाळी भेटीच्या रूपाने त्यांना

चिमण्यांनो,परत फिरा रे, जाहल्या तिन्ही सांजा
वृध्दाश्रमातून आर्त हाक : दिवाळीही जन्मदाते अधांतरीच
मोहन राऊत - अमरावती
ज्यांच्या आयुष्यात या जन्मदात्यांनी प्रकाश आणण्याचा प्रयत्न केला, त्यांचे जीवन तेजोमय केले़, अशा कुटुंंबातील कुलदीपक या जन्मदात्यांना विसरले आहेत़ आयुष्याच्या संध्याकाळी भेटीच्या रूपाने त्यांना मिणमिणती पणती देखील दाखवीत नाही़ या चिमण्यांनो परत फिरा रे़़़ घराकडे परत फिरा रे जाहल्या तिन्ही सांजा, असे म्हणत वृध्दाश्रमातील जन्मदाते आपल्या कुलदीपकांची प्रतीक्षा दिवाळी सणाला करीत आहेत. आज मंगळवारी सायंकाळपर्यंतही या जन्मदात्यांना घेण्यासाठी काळजाचा तुकडा आला नसल्याने हे वृध्द आयुष्यातील घर म्हणून सायंकाळचे दिवे वृध्दाश्रमातच लावत आहेत.
जिल्ह्यात शासनाच्या अनुदानावर संत गाडगेबाबा, मधुबन व मातोश्री असे तीन वृध्दाश्रम सुरु आहेत. समाजाचे ऋण फेडावे म्हणून स्वखर्चाने सुखशांती या वृध्दाश्रमासह आठ वृध्दाश्रम जिल्ह्यात आहेत. मंगळवारी सदर प्रतिनिधीने दीपावलीच्या पार्श्वभुमिवर या वृध्दाश्रमातील आई-वडिलांशी संवाद साधला असता आपल्या संपुर्ण आयुष्यात कुलदीपकासाठी किती कष्ट घेतले याची बेरीज-वजाबाकी त्यांनी मांडली. ते म्हणाले, सध्याच्या युगात पैसा मुबलक असल्यामुळे नाते संबंधातील प्रेम संपले आहे़ मुले पैशाने बायकांचे प्रेम विकत घेत आहे़ पण आई-वडीलांचे खरे प्रेम पैसे विकत घेता येत नाही़ हेच आजची पिढी विसरली आहे़ सध्याच्या पिढीला पाहिजे ते शिक्षण, हवा तेवढा पैसा मिळत आहे़ मात्र सस्कांराचे धडे कमी पडत असल्यामुळे म्हातारपणी आई-वडीलांना आश्रमात ठेऊन खोटी प्रतिष्ठा जपली जात आहे़
ते फटाके व कपडे
एका ७० वर्षीय वृध्दाने आपल्या नावाचा उल्लेख न करण्याचे सांगून वंशाच्या दिव्याची कथा विशद केली़ लहानपणी या कुलदीपकाला दिवाळीचे फटाके, फराळ, कपडे मिळावे म्हणून मी आपल्या जीवाचा आटापिटा केला. आज तोच मोठा झाल्यावर आम्हाला विसरला आहे़ दिवाळीसारख्या सणाला आम्हाला घरी नेण्यास टाळले आहे़ आयुष्यातील संध्याकाळ साजरी करतांना आपल्या कुटुंबांचा मुख्यत्वे मुलांचा आधार असावा लागतो़ मात्र वृध्दापकाळात आमच्या सारख्या आई-वडीलांना आश्रमाचा आधार घ्यावा लागत असल्याचे दु:ख त्यांनी व्यक्त केले़
वर्षातून दहा मिनीट मिळतेय वेळ
वंशाच्या दिव्याला जन्म दिल्यानंतर आयुष्याच्या अंधारात आधार मिळेल, मृत्यूनंतर याच कुलदीपकाच्या खाद्यांवर शेवटची विश्रांती यात्रा पूर्ण होईल, परंतू लग्न झाल्या बरोबर या कुलदीपकांने आपल्याला वृध्दाश्रमाचा रस्ता दाखविला. वर्षातून केवळ दहा मिनिट आपल्याला भेटायला येतो, अशी माहिती संत गाडगेबाबा वृध्दाश्रमातील ६५ वर्षीय जन्मदात्रीने सांगितले. दिवाळी तरी आपल्या घरी साजरी व्हावी, तळहाताला चटके घेत त्यांना मोठे केले़ आज ते आम्हाला विसरले आहे़ त्यामुळे वृध्दाश्रमात आयुष्याच्या सायंकाळचे दिवे तेवत ठेवायची वेळ आणली आहे. अशा मुलांना दीपावलीच्या सायंकाळी आनंदाचे दिवे लावतांना वृध्द आई-वडीलांची आठवण होणार काय, चिमुकल्या हातांना धरून दीपावलीचा दिवा, फटाके कसे लावायचे या गोष्टी ज्या जन्मदात्यांनी शिकविल्या त्या आई-वडीलांची दीपावली वृध्दाश्रमात साजरी होत आहे़