सोयाबीनचे बोगस बियाणे उगवले नाही

By Admin | Updated: July 28, 2014 23:17 IST2014-07-28T23:17:41+5:302014-07-28T23:17:41+5:30

येथील सुमित कृषी केंद्रामधून परिसरातील पूर्णानगरसह मार्की, रामा, येलकी, सावळापूर, वातोंडा, निरुळ, अंचलवाडी चिंचखेडा येथील शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे खरेदी केले.

Soybeans do not grow bogus seeds | सोयाबीनचे बोगस बियाणे उगवले नाही

सोयाबीनचे बोगस बियाणे उगवले नाही

वरिष्ठांकडे तक्रार : नुकसान भरपाई देण्याची मागणी
पूर्णानगर : येथील सुमित कृषी केंद्रामधून परिसरातील पूर्णानगरसह मार्की, रामा, येलकी, सावळापूर, वातोंडा, निरुळ, अंचलवाडी चिंचखेडा येथील शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे खरेदी केले. मात्र पेरणी केली असता ते सोयाबीन निघालेच नसल्याने हे शेतकरी झाले आहेत. या प्रकरणाचा तत्काळ तपास करुन बियाणे व पेरणी खर्च मिळवून द्यावा, अशी मागणी पूर्णानगर परिसरातील शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
यावर्षी मृग नक्षत्र पूर्णत: कोरडे गेले. त्यानंतर झालेल्या तुरळक पावसात पूर्णानगर परिसरातील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. यावेळी त्यांनी पूर्णानगर येथील सुमित कृषी केंद्रातून महाबीज कंपनीचे ३३५ जातीचे सोयाबीन बियाणे खरेदी केले. १० दिवस उलटून गेल्यावरही बियाणे उगवलेच नसल्याने शेतकरी वर्ग पार खचून गेला आहे. आधीच पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन पेरणी केली. परंतु बियाणे न उगवल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे.
या प्रकरणाची तक्रार काही शेतकऱ्यांनी कृषीविभाग, पंचायत समिती भातकुली, कृषी मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, भातकुली तहसीलदार यांच्याकडे केली आहे. शनिवारी अमरावती येथे झालेल्या पालकमंत्र्यांच्या बैठकीमध्ये बोगस बियाणे कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहे. वरील तक्रारीची दखल घेऊन अमरावती विभागाचे तालुका कृषी अधिकारी म्हस्के, महाबीज व्यवस्थापक देशमुख पं.स. अधिकारी वानखडे, उपविभागीय अधिकारी खर्चान यांनी सुमित कृषी केंद्र पूर्णानगरमधून ५३३ बॅगांची विक्री झाली असून त्यापैकी १४६ शेतकऱ्यांनी बियाणे परत आणली आहेत. यावेळी त्यांनी काही शेतांची पाहणी केली असून याबाबतचा अहवाल आम्ही पाठविणार आहो, असे सांगून शेतकऱ्यांना टोलवाटोलवीचे उत्तर दिले. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये असंतोष पसरला आहे. मागील दीड महिन्यानंतर पावसाने हजेरी लावली असून शेतकऱ्यांसमोर बोगस बियाण्यांचे नवे संकट उभे ठाकले आहे. सोयाबीन हे रोखीचे पीक असल्याने शेतकऱ्यांनी या पिकाला पसंती दिली. मात्र सोयाबीनचे बियाणेच बोगस निघाल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण धोक्यात आले आहे. गावागावतून तक्रारींचा पाऊस सुरु असून हजारो शेतकऱ्यांसमोर दुबार, तिबार पेरणीशिवाय दुसरा पर्याय उरला नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहे. तरी संबंधित कंपनीवर तत्काळ कारवाई करण्यात यावी व बियाणे तसेच पेरणीचा खर्च तत्काळ द्यावा अन्यथा पीडित शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा संबंधितांनी दिला आहे. याची सर्वस्वी जबाबदारी कंपनी व शासनाची राहील, असेही निवेदनातून कळविले आहे. सदर प्रकरणाचा तत्काळ तपास लावून नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी, अशी एकमुखी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Soybeans do not grow bogus seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.