आर्द्राच्या उंदरावर पेरणीची मदार
By Admin | Updated: June 22, 2016 00:16 IST2016-06-22T00:16:46+5:302016-06-22T00:16:46+5:30
कोकणानंतर थेट विदर्भात पावसाने हजेरी लावली असली तरी पेरणीयोग्य पाऊस जिल्ह्यात कुठेही झालेला नाही.

आर्द्राच्या उंदरावर पेरणीची मदार
पेरणी प्रारंभ : सर्वच तालुक्यांत तुरळक पाऊस
सचिन सुंदरकर अमरावती
कोकणानंतर थेट विदर्भात पावसाने हजेरी लावली असली तरी पेरणीयोग्य पाऊस जिल्ह्यात कुठेही झालेला नाही. मृग नक्षत्र संपला असून मंगळवारपासून आर्द्रान क्षत्राला प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी पहिल्या पावसावर पेरणीला प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत पाच टक्केपेक्षाही कमी पेरणी झाली आहे. जिल्ह्यात पेरणीचे एकूण क्षेत्रफळ ७ लाख १४ हजार ९५० हेक्टरमध्ये राहणार असल्याचा अंदाज कृषी खात्याने वर्तविला आहे.
विदर्भात सरासरी ७ जूननंतर मान्सूनचे आगमण होते. परंतु यंदा मान्सून लांबल्याने पेरणीला सुरुवात झाली नाही. मान्सूनच्या दमदार पावसाची प्रतीक्षा बळीराजाला लागली आहे. अमरावती जिल्ह्यातील चौदा तालुक्यांत अद्यापही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. मात्र तुरळक पावसाच्या सरीवर थोडीफार पेरणी केल्या गेली. अद्यापही वातावरणात उकाडा कायम आहे. पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने काही ठिकाणी धूळपेरणीला सुरुवात झाली आहे. अमरावती तालुक्यात सोयाबीनचा पेरा ३२ हजार हेक्टर क्षेत्रात राहणार असून कपाशी १०,०००, तूर ११०००, मूग ३००, ज्वारी ५००, उडदाचे क्षेत्रफळ ४०० हेक्टर राहणार आहे. भातकुली तालुक्यात २८ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीन, कपाशी ७ हजार हेक्टर, तूर १० हजार हेक्टर, मूग २ हजार हेक्टर, ज्वारी ५००, उडदाचा पेरा ५०० हेक्टर क्षेत्रात राहणार आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ३५ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीन, ८ हजार हेक्टरमध्ये कपाशी, १२ हजार हेक्टरमध्ये तूर, १ हजार हेक्टरमध्ये मूग, १ हजार हेक्टरमध्ये उडदाची पेरणी होण्याची शक्यता कृषी विभागाद्वारे वर्तनीली गेली आहे.
तिवसा तालुक्यात २३ हजार हेक्टरमध्ये सोयाबीन, १३ हजार हेक्टरमध्ये कपाशी, ६५०० हेक्टर क्षेत्रात तूर, २०० हेक्टरमध्ये मूग, ५०० हेक्टरमध्ये ज्वारीचा पेरा राहणार आहे. चांदूररेल्वे तालुक्यात २२ हजार हेक्टरमध्ये सोयाबीन, ११ हजार हेक्टरमध्ये कपाशी, ८ हजार हेक्टरमध्ये तूर, २०० हेक्टरमध्ये मूग, ५०० हेक्टरमध्ये ज्वारी, ८०० हेक्टरमध्ये उडदाचा पेरा होण्याचे प्रस्तावित आहे. तालुक्यात दोन टक्के पेरणी झाली. मृग नक्षत्रात पाऊस येऊन तीन वर्षांत प्रथमच पेरणीला सुरुवात झाली. धामणगाव, मोर्शी, वरुड, चांदूरबाजार, अचलपूर, अंजनगाव, दर्यापूर, धारणी, चिखलदरा तालुक्यात सोयाबीन, कपाशी आणि तुरीचा पेरा यंदा अधिक होण्याची शक्यता आहे. यंदाच्या खरीप हंगामात दमदार पाऊस कोसळल्यास याचा फायदा इतर पिकांसह संत्रा पिकाला होणार आहे. वरुड,मोर्शी, शेंदूरजनाघाट परिसरात संत्रा, मोसंबी व लिंबाच्या कलम खरेदीसाठी शेतकऱ्यांनी धाव घेतली आहे.