सोफिया वीज प्रकल्पाकडील १७२ कोटींची थकबाकी वसूल करणार!
By Admin | Updated: June 28, 2014 00:22 IST2014-06-28T00:22:40+5:302014-06-28T00:22:40+5:30
जिल्ह्यातील इंडिया बुल्स कंपनीच्या सोफिया वीज प्रकल्पाकडील अप्पर वर्धा धरण विभागाची थकबाकी सुमारे १७२ कोटी रूपयांवर पोहचली आहे.

सोफिया वीज प्रकल्पाकडील १७२ कोटींची थकबाकी वसूल करणार!
अमरावती : जिल्ह्यातील इंडिया बुल्स कंपनीच्या सोफिया वीज प्रकल्पाकडील अप्पर वर्धा धरण विभागाची थकबाकी सुमारे १७२ कोटी रूपयांवर पोहचली आहे. या कंपनीकडून पाणी करारानुसार पैसे देण्यास विलंब होत असल्याने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या विकासाला मोठ्या प्रमाणावर खीळ बसत आहे.
सोफिया वीज प्रकल्पाकडे कोट्यवधी रूपयांची थकबाकी अडकल्याने पाण्याच्या नियोजनास अडथळा निर्माण होत आहे. एकीकडे पाणीपट्टी भरली नाही किंवा वीज बिल भरले नाही तर शेतकऱ्यांची विनाविलंब वीज कापण्यात येते. मात्र दुसरीकडे कोट्यवधी रूपयांची थकबाकी असणाऱ्या इंडिया बुल्स कंपनीसाठी हेच शासन वेगळे धोरण ठेवते. आधीच सिंचनाचा अनुशेष असताना इंडिया बुल्स कंपनीबाबत सहानुभूतीचे धोरण कशासाठी? असा प्रतिप्रश्न यावेळी आ. रणजित पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात मांडून या गंभीर प्रकरणावर लक्ष वेधले. सदर थकबाकी तत्काळ वसूल करण्याकरिता शासनाने कठोर पावले उचलावी व योग्य कारवाई करावी, अशी सूचना सभागृहामध्ये केली आहे.
आ. पाटील यांच्या या सूचनेवर राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी सदर लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना कंपनीकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याचे मान्य करून आश्वासन दिले की, प्रती हेक्टरी एक लाख रूपये पुनर्स्थापनेचा खर्च घेण्याबाबत सरकार ठाम असून कंपनीकडून व्याज व दंडनीय रक्कम निश्चितपणे वसूल करण्यात येईल आणि जर कंपनीकडून रक्कम भरताना हयगय झाली तर १०० टक्के करारनामा रद्द करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी त्यांनी सभागृहात दिले. (प्रतिनिधी)