१५ कोटींची सौरपंप योजना बारगळली
By Admin | Updated: October 22, 2015 00:14 IST2015-10-22T00:14:20+5:302015-10-22T00:14:20+5:30
जिल्ह्यात धारणी, चिखलदरा, अचलपूर तालुक्यामधील २३ गावांमध्ये सुमारे १५ कोटी ५ लाख रुपये खर्च करुन सौरपंप बसविण्यात आलेत.

१५ कोटींची सौरपंप योजना बारगळली
सौर ऊर्जा प्लेट्स गेल्या चोरीला : बहुतांश गावात तांत्रिक अडचणी
मनीष कहाते अमरावती
जिल्ह्यात धारणी, चिखलदरा, अचलपूर तालुक्यामधील २३ गावांमध्ये सुमारे १५ कोटी ५ लाख रुपये खर्च करुन सौरपंप बसविण्यात आलेत. त्यापैकी बहुतांश गावातील सौरपंप बंद असल्याने सौरपंप योजना कुचकामी ठरली आहे.
जि.प.ची भूजलसर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, वरिष्ठ भूजल वैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विभाग आणि संबंधित ग्रा.पं.अशा तीन विभागांचा थेट संबंध सौरपंप योजनेशी येतो. प्रत्येक गावामध्ये ४ लाख ८८ हजार ७२८ रुपयांची सौरपंप योजना कार्यान्वित केली आहे. त्यामध्ये धारणी तालुक्यातील भुलूमगव्हाण, ढोकडा, खोपमार, खामडा, चोपण या गावांचा सौरपंप योजनेमध्ये समावेश आहे. चिखलदरा तालुक्यातील मेळघाट, बीबा, सेमाडोह, हातरु, ढाकणा, तेटू, केशरपूर आणि पातखाऊ इत्यादी गावे समाविष्ट आहेत. अचलपूरमधील जलालपूर, कुंभी, अंजनगाव तालुक्यातील चिंचोली, अशा एकूण ३१ गावांमध्ये सौरपंप बसविण्यात आले आहेत. त्यावर भूजल सर्वेक्षण विभागाने १५ कोटी ५ लाख रुपये सन २०११ पासून खर्च केले आहेत. प्रशासनाचा सर्वच गावातील सौरपंप सुरु असल्याचा दावा असला तरी धारणी तालुक्यातील कोट, ढोकडा आणि खोपमार, चिखलदरा तालुक्यातील ढाकणा या गावातील सौरपंप बंद आहेत. बहुतांश गावातील सौरपंप तांत्रिक अडचणींमुळे बंद आहेत.
ज्या गावाची लोकसंख्या ३०० ते ४०० च्या आत आहेत आणि जेथे वीज नाही तसेच जेथे तांडावस्ती आहे, अशा ठिकाणी सौरपंप बसविण्यात येतात. अशा गावांमध्ये पाण्याची टाकी, २०० मीटरची पाईप लाईन आणि २ ठिकाणी नळ कनेक्शन असे या योजनेचे स्वरुप आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे संपूर्ण योजनाच बारगळली आहे. अनेक गावातील सौरऊर्जा प्लेट्स चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे गावात पाणी पुरवठा विस्कळीत झाली आहे. यासंदर्भात वरिष्ठ भूजल वैज्ञानिक कराड यांचेशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.