सौर ऊर्जा प्रकल्पातून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:15 IST2021-07-07T04:15:22+5:302021-07-07T04:15:22+5:30
वरुड : तालुक्यातील गव्हाणकुंड येथे १६ मेगावॅट वीज निर्मिती करणारा सौर ऊर्जा प्रकल्प विदर्भात एकमेव आहे. शेतकऱ्यांना कृषी पंपाकरिता ...

सौर ऊर्जा प्रकल्पातून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार सुरू
वरुड : तालुक्यातील गव्हाणकुंड येथे १६ मेगावॅट वीज निर्मिती करणारा सौर ऊर्जा प्रकल्प विदर्भात एकमेव आहे. शेतकऱ्यांना कृषी पंपाकरिता दिवसा वीजपुरवठा मिळावा म्हणून राज्य शासनाचा गव्हाणकुंड येथे १६ मेगा वॅटचा वीज निर्मिती करणारा सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुरू झाला आहे. यामुळे रात्रीऐवजी दिवसा शेतकऱ्यांना वीजपुरवठा होत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. याचा लाभ ५ हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे.
राज्यशासनाने शेतकऱ्यांना कृषी पंपाकरिता दिवसा वीज मिळावी म्हणून मुख्यमंत्री सौर ऊर्जा विद्युत वाहिनी योजनेअंतर्गत विदर्भातील एकमेव १६ मेगा वॅट विद्युत प्रकल्पाचे २४ डिसेंबर २०१७ ला भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तत्कालीन पालकमंत्री प्रवीण पोटेंसह इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडले होते . १६ मेगा वॅट वीज निर्मिती करणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम तीन वर्षांपासून सुरू असून ते गेल्या महिन्यात पूर्णत्वास गेले आहे. येथून १६ मेगा वॅट वीज प्रकल्पातून शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा सुरू झाला आहे. तर सुरुवातीला अंदाजे ५ हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असून शेतकऱ्यांना रात्री ओलिताकरिता जावे लागणार नाही. तर या सौर ऊर्जेमुळे विजेचे दर सुद्धा कमी आकारण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना वरदान ठरणारा प्रकल्प उभा झाला. यामधून वीजनिर्मिती होऊन महावितरण ही वीज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणार असून टेंभूरखेडा उपकेंद्रापर्यंत पोहोचली आहे. यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात रात्रीचे भारनियमन बंद होऊन दिवसा वीज पुरवठा होण्याची चिन्हे निर्माण झाल्याने दिलासा मिळाला आहे.