लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मी मंत्री असूनही कधीकधी अजित पवार माझ्या एखाद्या कामाला नकार देतील; पण संजय खोडके आणि सुलभा खोडके यांना मात्र नाही म्हणू शकत नाहीत. त्यांच्यावरील विश्वास आणि प्रेमामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोऱ्या कागदावरही सही करतील, असा मिश्कील टोला महसूल मंत्री व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी येथे लगावला.
जिल्हा कोषागार कार्यालयाच्या परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या 'जिजाऊ सभागृहा'च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आमदार खोडके दाम्पत्यावर अजित पवार यांचं विशेष प्रेम आहे. आ. सुलभा खोडके आणि आ. संजय खोडके हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. राष्ट्रवादीत फूट पडल्यावरही संजय खोडके अजित पवार यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. अजित पवार यांचे खोडके कुटुंबाशी घनिष्ठ संबंध आहेत. कौटुंबिक कार्यक्रमांनाही ते न चुकता उपस्थित राहतात, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. अमरावतीच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पहू देणार नाही. महाराष्ट्र सरकारच्या ४८ आणि केंद्र सरकारच्या ६८ विभागातील योजनांचा लाभ अमरावतीला मळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. तसेच अमरावतीच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही पालकमंत्र्यांनी दिले.