वाघांच्या मिशांचीही तस्करी; व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांनी जप्त केल्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 04:59 PM2019-01-11T16:59:32+5:302019-01-11T16:59:53+5:30

पूर्व मेळघाट वनविभागाच्याही हाती लागलेत वाघनखे, दात : मोथ्याच्या जंगलात वाघिणीसह छाव्याचे वास्तव्य

Smuggling of tigers mustach; The Tiger Reserve officials seized them | वाघांच्या मिशांचीही तस्करी; व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांनी जप्त केल्या 

वाघांच्या मिशांचीही तस्करी; व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांनी जप्त केल्या 

googlenewsNext

- अनिल कडू
परतवाडा (अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांनी वाघाच्या चार मिशांचे केस जप्त केले असून, पूर्व मेळघाट वनविभागाच्या हाती वाघ नखे आणि दात लागले आहेत. मेळघाटातील वाघांची सुरक्षा धोक्यात आली आहे. एकामागून एक वाघ मरत आहेत. 


मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत गुगामल वन्यजीव विभागातील चिखलदरा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी चार दिवसांपूर्वी वाघाच्या चार मिशांचे केस आरोपींकडून जप्त केले आहेत. त्यामुळे चार वाघांच्या शिकारीचा उलगडा होण्याची शक्यता आहे. गिरगुटी प्रकरणातही महत्त्वाचे धागेदोरे त्यांच्या हाती लागले आहेत. दुसरीकडे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रातील मृत वाघाचे नख आणि दात आरोपींसह पूर्व मेळघाट वनविभागाच्या हाती लागले आहेत. हा मृत वाघही उघडकीस आलेल्या व्याघ्रहत्येच्या व्यतिरिक्त ठरला आहे.


दरम्यान, पूर्व मेळघाट वनविभागांतर्गत चिखलदरा वनपरिक्षेत्रातील मोथ्याच्या जंगलात ४ जानेवारीला एक मोठा वाघ मृतावस्थेत आढळून आला. तब्बल १२ ते १५ दिवसांनी उघडकीस आलेल्या या घटनेतील मृत वाघाचा मृत्यू नैसर्गिक, अपघाती की घातपाताने, या अंगांनी चौकशी अधिकारी शोध घेत आहेत. अकोट वन्यजीव विभागातील ‘जेनी’ नामक स्रिफर डॉगचीही यात मदत घेतली गेली. मृत वाघासोबत वाघीण बछड्यासह (छावा) वास्तव्यास असल्याचे निदर्शनास आले आहे. वाघ, वाघीण आणि बछड्याचे वास्तव्य असल्याची माहिती संबंधितांना नव्हती. त्याबाबत मागील दीड वर्षातील खैरीयत अहवालात उल्लेखही नाही. 


मृत वाघाच्या शरीरातील काही अवयवांचे नमुने नागपूर आणि हैद्राबाद येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. घटनेच्या अनुषंगाने चिखलदरा वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपालांसह मोथा वर्तुळाचे वनपाल आणि वनरक्षकांना वरिष्ठांनी शोकॉज नोटीस बजावली आहे.

पाच वाघ मारले, एकमेव वनगुन्हा
पूर्व मेळघाट वनविभागांतर्गंत अंजनगाव वनपरिक्षेत्रातील खोंगडा, गिरगुटी परिसरात आरोपींच्या बयाणावरून पाच महिन्यांत पाच वाघ मारले गेल्याचे वरिष्ठांनी स्पष्ट केले. याची कल्पना पूर्व मेळघाट वनविभागाचे सहायक वनसंरक्षक अशोक पऱ्हाड यांना आहे. तेच या प्रकरणात चौकशी अधिकारी आहेत. मात्र, त्यांनी आपल्या दप्तरी केवळ एक वनगुन्ह्याची नोंद केली आहे. जवळपास दीड महिन्यांपासून चौकशी सुरू असल्याचे ते सांगत आहेत.


आणखी एक वाघ
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रातील एका मृत वाघाचे दात आणि नख पूर्व मेळघाट वनविभागाचे सहायक वनसंरक्षक अशोक पऱ्हाड यांच्या हाती लागले आहेत. त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले. हे अवयव बिबट्याचे की पट्टेदार वाघाचे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तपासप्रकरणी गुप्तता बाळगली जात आहे. 

शिकारीची माहिती व्याघ्र प्रकल्पाला
खोंगडा-गिरगुटीत पूर्व मेळघाट वनविभागाचेही मुख्यालय आहे. खोंगडा, गिरगुटी, अंबापाटी, टेंब्रुसोंडा या संवेदनशील वनवर्तुळात या विभागांतर्गत वनरक्षक, वनपाल कार्यरत आहेत. पण, या वाघांच्या शिकारीची माहिती व्याघ्र प्रकल्पाने पुरविली आहे.

उमरीहून ताब्यात आरोपींचा गिरगुटीशी संबंध
मेळघाट व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांनी ३१ डिसेंबरला परतवाडा-चिखलदरा रोडवर भिलखेडा फाट्यावर वाघाची कातडी पकडली. यातील वाघ गिरगुटीशी संबंधित नसल्याने हे प्रकरण सिपना वन्यजीव विभागाच्या चौराकुंड वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांकडे हस्तांतरित करण्यात आले. मध्य प्रदेशतील बैतूल जिल्ह्यातील उमरी येथून ताब्यात घेतलेले आरोपी गिरगुटीशी संबंधित असल्याचे व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 


जप्त करण्यात आलेल्या वाघाच्या चार मिशा म्हणजे चार वाघ म्हणता येणार नाही. याबाबत आणखी तपास करण्यात येत आहे.
- लक्ष्मण आवारे, वनपरिक्षेत्र अधिकारी

Web Title: Smuggling of tigers mustach; The Tiger Reserve officials seized them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.