धामणगावलगत चार गावांत उभारणार स्मार्ट सिटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:29 IST2020-12-13T04:29:04+5:302020-12-13T04:29:04+5:30
प्रकियेला वेग, दोन हजार हेक्टर शेतजमीन भूसंचयन पद्धतीने घेणार ताब्यात लोकमत स्पेशल मोहन राऊत धामणगाव रेल्वे : विदर्भाच्या अर्थकारणाचा ...

धामणगावलगत चार गावांत उभारणार स्मार्ट सिटी
प्रकियेला वेग, दोन हजार हेक्टर शेतजमीन भूसंचयन पद्धतीने घेणार ताब्यात
लोकमत स्पेशल
मोहन राऊत
धामणगाव रेल्वे : विदर्भाच्या अर्थकारणाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या कृषी समृद्धी महामार्गालगत २० नवनगरांची निर्मिती करण्यात येणार आहे. धामणगाव शहरालगत चार गावांतील दोन हजार हेक्टर शेत जमीन भूसंचयन पद्धतीने ताब्यात घेण्यात येणार आहे. यासंदर्भातील राजपत्र शासनाने नुकतेच काढले आहे.
नागपूर-मुंबई या ७०१ किलोमीटर लांबीच्या स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या कामाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर अधिक वेग आला आहे. या मार्गावर नैसर्गिक वायूची पाईपलाईन, सौरऊर्जा प्रकल्प, ऑप्टिकल फायबर जाळे तसेच आवश्यक पायाभूत सुविधा पुरविल्या जाणार आहेत. समृद्धी महामार्गालगतच्या धामणगाव शहराजवळील दत्तापूर, आसेगाव, नारगावंडी, जळगाव आर्वी या गाव परिसरातील तब्बल दोन हजार हेक्टर शेत जमीन भूसंचयन पद्धतीने घेतली जाणार आहे. दत्तापूर असे नामकरण असलेल्या नवनगर परिसरात साधारणत: एक लाख लोकसंख्या रहिवासी राहू शकेल, यासाठी सर्व सोई सुविधा परिसर उद्योग पुढील तीन वर्षांत या ठिकाणी उभारल्या जाणार आहेत.
अशी राहणार भूसंचयन पद्धत
शेतजमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना जिरायती जमिनीला प्रतिहेक्टर ७५ हजार रुपये प्रतिवर्ष मोबदला दिला जाणार आहे. बागायती जमिनीला १ लाख १२ हजार ५०० रुपये आणि हंगामी बागायती जमिनीला प्रतिहेक्टर १.५० लाख रुपये मोबदला दिला जाणार आहे. याशिवाय १० वर्षांपर्यंत प्रतिवर्ष या रकमेत १० टक्के वाढ केली जाणार आहे. सोबतच या नवनगरात २५ टक्के विकसित भूखंड दिला जाणार आहे. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन यात गेली, त्या शेतजमिनीचे दरवर्षी पीक बुडीत मोबदला शासनाच्या ४ जानेवारी २०१७ च्या शासकीय अध्यादेशाप्रमाणे मिळणार आहे.
कोट
धामणगाव तालुक्यातील चार गाव परिसरातील जवळपास दोन हजार हेक्टर शेतजमीन भूसंचयन पद्धतीने घेतली जाईल. तीन वर्षांत सर्व सोई सुविधांसह नवनगरात शेतकऱ्यांना भूखंड मिळणार आहे.
- विवेक घोडके,
उपजिल्हाधिकारी
तथा प्रशासक समृद्धी नवनगर निर्मिती