वाळूमाफियांवर मोक्का लावा

By Admin | Updated: June 22, 2016 23:55 IST2016-06-22T23:55:38+5:302016-06-22T23:55:38+5:30

महसूल अधिकाऱ्यांच्या जीवाला धोका होऊ नये, यासाठी अवैध रेती व्यावसायिकांवर मोक्का (एमपीडीए) अंतर्गत कारवाई केली जाईल.

Slow the waves on the sand | वाळूमाफियांवर मोक्का लावा

वाळूमाफियांवर मोक्का लावा

पालकमंत्र्यांचे आदेश : महसूल, पोलीस, आरटीओची समन्वय बैठक
अमरावती : महसूल अधिकाऱ्यांच्या जीवाला धोका होऊ नये, यासाठी अवैध रेती व्यावसायिकांवर मोक्का (एमपीडीए) अंतर्गत कारवाई केली जाईल. मात्र अधिकाऱ्यांनी कर्तव्याप्रती प्रामाणिक रहावे, असे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बुधवारी आयोजित महसूल, पोलीस व आरटीओच्या समन्वय बैठकीत निक्षून सांगितले.
बैठकीला जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक, जिल्हा पोलीस अधीक्षक, लखमी गौतम, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीपाद वाडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर उपस्थित होते. मागील वर्षापेक्षा यंदा अवैध रेती वाहतुकीच्या अधिक कारवाया झाल्या आहेत. एप्रिल २०१५ ते मे २०१६ या कालावधीत तब्बल १०१७ कारवाया करण्यात आल्यात. यामध्ये ९६२ वाहनांवर कारवाई करून २ कोटी २५ लाख ५३ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. मागील वर्षी शहरात अवैध रेतीचा साठा होऊ दिला नाही. त्यामुळे शासनाच्या महसूलात भर पडल्याचे त्यांनी सांगीतले. लिलावधारकांनी त्याच घाटातून रेती उचलली पाहिजे. ठराविक परिमाणापेक्षा अधिक रेतीची वाहतूक करू नये, एक मिटरपेक्षा अधिक उत्खनन करता येणार नाही व कुठल्याही यंत्राचा वापर करता येणार नाही, वाहन रेतीघाटातून निघण्यापूर्वी एसएमएस द्यायला हवा. वाहनांवर कारवाई होत असताना एसएमएस आल्यास तो खोटा असतो, असे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सांगितले. बैठकीला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व पोलीस निरीक्षक उपस्थित होते.

- तर पाठविता येईल एमपीडीएसाठी प्रस्ताव
अवैध रेती वाहतूकदारावर दोन गुन्हे दाखल आहेत व तेही सहा महिन्यांच्या कालावधीतील असतील तर त्या व्यक्तिविरोधात एमपीडीएअंतर्गत कारवाईचा प्रकल्प पाठविता येतो, असे जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी सांगितले. महसूल विभागाला कधीही सरंक्षकाची गरज भासल्यास तासाभराच्या आत उपलब्ध करुन देऊ, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

अशा झाल्यात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाया
जिल्ह्यात एप्रिल २०१५ ते मे २०१६ या कालावधीत १०१७ अवैध वाळू वाहतुकीबाबत कारवाया करण्यात आल्यात. यामध्ये ९६२ वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये २ कोटी २५ लाख ५३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. सर्वाधिक १४४, अचलपूर १२३, भातकुली ५७, तिवसा ४२, धामणगाव ७०, नांदगाव ४७, मोर्शी ६४, वरुड ८६, चांदूरबाजार ९९, दर्यापूर २४, अंजनगाव ९५, धारणी ४४ व चिखलदरा तालुक्यात ८ कारवाया करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

मोक्का अंतर्गत कारवाई होऊ शकते
अवैध रेतीवाहतूकदार व व्यवसायिक यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करता येते. यासाठी त्याच्यावर २आॅनलाईन गुन्ह्यांची नोंद हवी. त्याच्याविरूद्ध हिंसेचा गुन्हा असेल तरच ही कारवाई करता येते, अशी माहिती शहर पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी बैठकीत दिली.

सीआरपीसी अ‍ॅक्ट अंतर्गत सुधारणा हवी
एमएलआरसी कायद्यानुसार तहसीलदारांना वाहनजप्तीचे व उपविभागीय अधिकाऱ्यांना जप्त वाहन सोडण्याचे अधिकार दिले आहेत. यामध्ये सीआरपीसी कायद्यांंतर्गत दोन गुन्हे दाखल असताना ती व्यक्ती अवैध रेती वाहतूक करताना पुन्हा सापडल्यास एमपीडीए अंतर्गत कारवाई होऊ शकते.

Web Title: Slow the waves on the sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.