धामणगाव रेल्वे : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूची होणारी संख्या धामणगाव तालुक्यात सर्वाधिक आहे. गत आठवड्यात ५३ वर्षांखालील १६ जण कोरोनाबळी ठरले. साधी सर्दी, ताप, खोकला अंगावर काढणे मृतांच्या जिवावर बेतले आहे.
धामणगाव तालुक्यात कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक गावात ३० ते ४० पेक्षा अधिक रुग्ण कोरोना चाचणीतून पुढे येत आहे. सात दिवसांत कोरोनामुळे दगावलेल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. जुना धामणगाव, वाढोणा, निंबोरा बोडखा, भिल्ली, तळेगाव दशासर येथील ५३ वर्षांखालील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विशेष म्हणजे, धामणगाव शहरात मृतांची संख्या सर्वाधिक आहे.
सर्दी, तापाकडे केले दुर्लक्ष
अनेकांनी साधी सर्दी, ताप, खोकलाच तर आहे, असा विचार करून शेतीच्या कामाचा नित्यक्रम चार - पाच दिवस सुरू ठेवला. मात्र, दिवसेंदिवस त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी होत गेली. प्रकृती चिंताजनक झाली. ऑक्सिजनयुक्त बेड जिल्हास्तरावर मिळाले नाही. काही ठिकाणी उपचार करीत असताना प्रकृती अधिक खालावली. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
ग्रामीण भागात कोरोना सुसाट
तालुक्यात शहरी भागात कोरोनाची त्रिसूत्री पाळत असली तरी ग्रामीण भागात होणारे दुर्लक्ष संसर्गास कारणीभूत ठरत आहे. अनेक गावांत भाजीविक्रेते, किराणा दुकानदार, स्वस्त धान्य दुकानदार यांची महिन्याकाठी कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे. मात्र, या गंभीर बाबीकडे सर्वांचे दुलक्ष होत आहे. अनेक ग्रामस्थ कोरोना पॉझिटिव्ह असताना गावात फिरत असल्याचे चित्र काही गावांचे असल्याने अनेक गावे ‘हॉट स्पॉट’ बनली आहेत.
कोट
आठ दिवसांत तालुक्यात कोरोनाचे प्रमाण वाढले. प्रत्येक गावात दौरा करून मास्क न लावणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
- गौरवकुमार भळगाठिया, तहसीलदार, धामणगाव रेल्वे