अमरावतीत सहा जुगारी पकडले, चौघांनी काढला पळ!
By प्रदीप भाकरे | Updated: December 4, 2023 18:39 IST2023-12-04T18:39:39+5:302023-12-04T18:39:50+5:30
शिरजगाव कसबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुऱ्हा येथील शेतशिवारात जुगार खेळणाऱ्या सहा जुगाऱ्यांना अटक करण्यात आली.

अमरावतीत सहा जुगारी पकडले, चौघांनी काढला पळ!
अमरावती: शिरजगाव कसबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुऱ्हा येथील शेतशिवारात जुगार खेळणाऱ्या सहा जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. तर चौघे जण पसार होण्यास यशस्वी झाले. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २ डिसेंबर रोजी ही कारवाई केली. आरोपींकडून पाच मोटर सायकल, पाच मोबाईल व नगदी ३५३०० रुपये व जुगार साहित्यासह एकूण २ लाख ९८ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक जुगाऱ्यांमध्ये शेख मोसम शेख बशीर (२५, करजगाव), अमित रूपराव डवरे (२४), गफ्फार बेग मेहमूद बेग (४२), दीपक संजय नवले (३०, सर्व. रा. कुर्हा), अमोल पांडुरंग कुसटकर (२८, रा. तळेगाव) तथा किसन रामरावजी बोबडे (५०, रा. लाखनवाडी) यांचा समावेश आहे. तर रवींद्र मानकर (रा. करजगाव), मोहन खरे, प्रकाश बोरवर (दोघेही रा.कुर्हा) व योगेश वानखडे (रा.कांडली अंबाडा) हे फरार झालेत. कुऱ्हा ते कोंडवर्धा रोडवरील शेतशिवारात सार्वजनिक ठिकाणी तो जुगार भरविला गेला होता.
यांनी केली कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक सचिन पवार, अंमलदार, युवराज मानमोठे, स्वप्निल तंवर, रविन्द्र वऱ्हाडे, सागर नाठे, गेठे यांनी ही कारवाई केली. आरोपींना शिरजगाव कसबा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.