सहा अभियांत्रिकीच्या रोखल्या गुणपत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 05:00 IST2020-01-21T05:00:00+5:302020-01-21T05:00:29+5:30
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार महाविद्यालये अथवा प्राध्यापकांचा परीक्षा व मूल्यांकनात सहभाग अनिवार्य केला आहे. मात्र, काही महाविद्यालयांतील प्राध्यापक त्यांच्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत विद्यापीठात मूल्यांकनासाठी सहभाग घेत नाहीत.

सहा अभियांत्रिकीच्या रोखल्या गुणपत्रिका
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित सहा अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या गुणपत्रिका रोखण्यात आल्या आहेत. संबंधित महाविद्यालयांच्या प्राध्यापकांनी मूल्यांकनात कुचराई केल्याप्रकरणी ठपका ठेवण्यात आला आहे. या अभियांत्रिकीच्या प्राचार्यांची २३ जानेवारी रोजी कुलगुरूंसमक्ष पेशी होणार आहे. त्याअनुषंगाने प्राचार्यांना नोटीस बजावण्यात आली आहे
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार महाविद्यालये अथवा प्राध्यापकांचा परीक्षा व मूल्यांकनात सहभाग अनिवार्य केला आहे. मात्र, काही महाविद्यालयांतील प्राध्यापक त्यांच्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत विद्यापीठात मूल्यांकनासाठी सहभाग घेत नाहीत. विद्यापीठ नियमानुसार महाविद्यालयात परीक्षार्थ्यांच्या संख्येनुसार ५० टक्क्यांपेक्षा जास्त संबंधित प्राध्यापकांनी उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करणे अपेक्षित आहे. परंतु विद्यापीठांतर्गत सहा अभियांत्रिकीच्या प्राध्यापकांचा मूल्यांकनात वाटा अत्यल्प असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने या सहा महाविद्यालयांच्या प्राचार्यांना नोटीस बजावून कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्यासमक्ष गुरूवारी पेशी होणार आहे. मूल्यांकनासाठी प्राध्यापकांना का पाठविले नाही? याची कारणमीमांसा प्राचार्यांना द्यावी लागणार आहे. कारणांमध्ये काही चुकीचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे संकेत आहे. तथापि याप्रकरणी कुलगुरू अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती आहे. सहा अभियांत्रिकींचा निकाल आॅनलाईन जाहीर करण्यात आला असून, केवळ विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका रोखण्यात आल्या आहेत.
३, ५ व ७ सेमिस्टर निकालाच्या गुणपत्रिका देण्यात आल्या नाहीत. प्राचार्यांची पेशी आणि वस्तुनिष्ठ खुलाशानंतर याप्रकरणी पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. ५,४०० विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका रोखण्यात आल्या आहेत.
गुणपत्रिका रोखलेली ही सहा महाविद्यालये
बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी, पुसद
जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय, यवतमाळ
अरूणा अभियांत्रिकी महाविद्यालय, चिखली
कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर
जी.एस. रायसोनी अभियांत्रिकी,अमरावती.
शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, बुलडाणा