११ कोटी थकीत असल्याने आजपासून कंत्राटदारांनी केले साफसफाई काम बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 13:12 IST2024-10-01T13:11:27+5:302024-10-01T13:12:08+5:30
Amravati : कंत्राटदारांनी उपसले आंदोलनाचे हत्यार

Since 11 crores is outstanding, the contractors have stopped the cleaning work from today
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिका प्रशासनाकडे साफसफाईची सात महिन्यांची तब्बल ११ कोटी रुपयांची देयके थकीत असल्याने पाचही झोनच्या कंत्राटदारांनी १ ऑक्टोबरपासून साफसफाई काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सोमवारी महापालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे अवगत करण्यात आले आहे.
अमरावती महानगरातील पाचही झोनच्या साफसफाई कंत्राटदारांनी देयके अदा करा, अन्यथा १ ऑक्टोबरपासून साफसफाई काम बंद आंदोलन केले जाईल, असे निवेदनाद्वारे कळविले होते. मात्र, गत १५ दिवसांपासून प्रशासनाकडून देयकांसाठी कोणत्याही प्रकारच्या हालचाली होत नसल्याने अखेर आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. कंत्राटी साफसफाई कर्मचारी आंदोलनात सहभागी होणार असल्यामुळे २ ऑक्टोबर गांधी जयंतीपासून सुरू होणाऱ्या स्वच्छता आठवड्यावर गंभीर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.
महानगरपालिकेला ८ कोटी ४२ लाखांचे अनुदान प्राप्त
अमरावती महानगरपालिकेला राज्य शासनाकडून पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाकडून ८ कोटी ४२ लाख १६ हजार २१४ एवढे अनुदान प्राप्त झाले आहे. असे असताना प्रशासन मात्र 'तारीख पे तारीख असा प्रयोग करीत असल्याचा आक्षेप साफसफाई कंत्राटदारांचा आहे. हे अनुदान पिण्याचे पाणी, घनकचरा व्यवस्थापनासाठी वापरता येईल, असा ४ सप्टेंबर २०२४ रोजीचा शासनादेश आहे. मात्र, साफसफाई कंत्राटदारांना सलाइनवर ठेवण्यात येत आहे. साफसफाई कंत्राटदारांना गत सात महिन्यांपासून छदामही दिला नाही, अशी माहिती आहे.
"थकीत देयके मिळावीत, यासाठी साफसफाई कंत्राटदारांचे निवेदन प्राप्त झाले आहे. यातून सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रथल सुरू आहे. निधीची जुळवाजुळव केली जात आहे."
- सचिन कलंत्रे, आयुक्त, अमरावती महानगरपालिका