अमरावती, बडनेरा रेल्वेस्थानकांवर सन्नाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:13 IST2021-05-11T04:13:15+5:302021-05-11T04:13:15+5:30
कोरोना संसर्गाचा परिणाम, राज्यातील २१ जोडी रेल्वे गाड्या ३० जूनपर्यंत रद्द अमरावती : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य ...

अमरावती, बडनेरा रेल्वेस्थानकांवर सन्नाटा
कोरोना संसर्गाचा परिणाम, राज्यातील २१ जोडी रेल्वे गाड्या ३० जूनपर्यंत रद्द
अमरावती : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने १५ मेपर्यंत मिनी लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे रेल्वेत गर्दी ओसरली असून, रेल्वे बाेर्डाने राज्यातील तब्बल २१ जोडी रेल्वे गाड्या ३० जूनपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी आता अमरावती, बडनेरा रेल्वेस्थानकावर कमालीचा सन्नाटा निर्माण झाला आहे. दिवसातून दोन, तीन गाड्यांचेच अवागमन सुरू असल्याचे चित्र आहे.
रेल्वे बोर्डाने १० मेपासून राज्यातील महत्त्वाच्या २१ जाेडी रेल्वे गाड्या रद्द केल्यामुळे नागपूर-भुसावळ मार्गावरील प्रवाशांना याचा फटका बसला आहे. अचानक ३० जूनपर्यंत गाड्या रद्द झाल्यामुळे आरक्षण तिकीट रिफंड मिळविण्यासाठी गर्दी वाढली आहे. अमरावती रेल्वेस्थानकाहून आजमितीला एकही गाडी धावत नसल्याने प्लॅटफार्मवर सर्वत्र शुकशुकाटाचे चित्र अनुभवता येत आहे. एरव्ही प्रवाशांच्या गर्दीने गजबजणाऱ्या येथील मॉडेल रेल्वेस्थानकावर कर्मचारी, सुरक्षा रक्षकांशिवाय कोणीही दिसून येत नाही. अशातच जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ९ ते १५ मेदरम्यान कठोर संचारबंदी लागू केली. त्याचा परिणाम रेल्वे गाड्यांवर झाला आहे. अनेकांनी बाहेरगावी जाण्यासाठी काढलेले आरक्षण तिकीट परत करण्यासाठी रेल्वे खिडक्यांवर पैसे मिळविण्यासाठी गर्दी करीत आहेत. अमरावती-मुंबई, अमरावती-तिरुपती, अमरावती-सुरत या गाड्या बंद आहेत. बडनेरा रेल्वे स्थानकाहून हावडा-मुंबई मेल, एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस, अहमदाबाद-चेन्नई नवजीवन एक्स्प्रेस या गाड्या सुरू आहेत. अमरावती रेल्वेस्थानकाहून आरक्षण तिकिटाची रक्कम परत मिळण्यासाठी दर दिवशी एक ते सव्वा लाख रुपये परत करण्यात येत आहे.
-------------------
गत १५ दिवसांपासून रेल्वेस्थानकावरील गर्दी ओसरली आहे. आरक्षण रिफंड परत मिळण्यासाठी प्रवासी येतात. अमरावती-मुंबई एक्स्प्रेस रद्द झाल्याचा मोठा परिणाम जाणवत आहे. ३० जूनपर्यंत अशीच स्थिती असणार आहे.
- डी.व्ही. धकाते, निरीक्षक, रेल्वे आरक्षण केंद्र अमरावती.