महापौर पदावरुन आघाडीत ‘बिघाडी’चे संकेत
By Admin | Updated: August 17, 2014 22:53 IST2014-08-17T22:53:20+5:302014-08-17T22:53:20+5:30
महापालिकेत सत्तेची फळे चाखण्यासाठी समसमान पदे वाटपाच्या सुत्रानुसार काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी करुन सत्ता काबिज केली. मागील अडीच वर्षांचा कार्यकाळ याच पार्श्वभूमीवर चालला.

महापौर पदावरुन आघाडीत ‘बिघाडी’चे संकेत
विरोधकांचाही डोळा : कॉंग्रेस शब्द फिरवण्याच्या तयारीत
अमरावती : महापालिकेत सत्तेची फळे चाखण्यासाठी समसमान पदे वाटपाच्या सुत्रानुसार काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी करुन सत्ता काबिज केली. मागील अडीच वर्षांचा कार्यकाळ याच पार्श्वभूमीवर चालला. मात्र लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ही दोन गटात विभागली गेल्याने या भांडणाचा लाभ घेण्याचे प्रयत्न काँग्रेस नेतेमंडळींनी चालविला आहे. समसमान सत्ता वाटपाच्या सुत्रानुसार संभावित महापौर पद हे राष्ट्रवादीच्या वाट्याला येणे अपेक्षित आहे. मात्र सप्टेंबरमध्ये होऊ घातलेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत राजकारण कोणते वळण घेणार याकडे लक्ष लागले आहे.
आ. रावसाहेब शेखावत आणि माजी आ. सुलभा खोडके यांनी महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी सन- २०१२ मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी करताना रितसर करार केला. पाच वर्षांच्या सत्तावाटपाचे सुत्रे ठरविताना पहिले महापौर पद हे काँग्रेसच्या वाट्याला तर अडीच वर्षांनंतरचे दुसरे महापौर पद हे राष्ट्रवादीच्या वाट्याला देण्याचे ठरविण्यात आले. तसेच स्थायी समिती सभापती, झोन समिती सभापती आणि विशेष समित्या या समसमान वाटप करण्याचा करार या दोन्ही नेत्यांनी आपसात आघाडी करताना केला. परंतु लोकसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांना पक्षातून निष्कासित करण्यात आले. परिणामी महापालिकेत राष्ट्रवादीची २३ सदस्य संख्या असलेल्यापैकी १० सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहिलेत. तर उर्वरित १३ सदस्य हे संजय खोडके यांच्याशी जुळून राहिलेत.
हे १३ सदस्य अद्यापही खोडके यांच्या गटाशी एकनिष्ठ आहेत. मात्र राष्ट्रवादी दोन गटात विभागली गेल्याने महापालिकेत गटनेते पदाचा वादही उफाळून आला आहे. राष्ट्रवादीने सुनील काळे यांची गटनेते पदी नियुक्ती केली आहे.
या नियुक्तीची घोषणेनेदेखील आमसभेत गदारोळात झाला होता. संजय खोडके गटाचे गटनेता म्हणून अविनाश मार्डीकर यांच्या अपात्रतेचा मुद्दा आजही उच्च न्यायालयात प्रविष्ठ आहे.
सुनील काळे की अविनाश मार्डीकर यापैकी राष्ट्रवादीचा गटनेता कोण? या विषयाच्या प्रकरणाचा निकाल अद्यापही न्याय प्रविष्ठ आहे. एवढेच नव्हे तर चेतन पवार, मिलिंद बांबल, रिना नंदा व अविनाश मार्डीकर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या प्रकरणी अपात्रतेविषयीचा हा वादही न्यायालयात सुरु आहे.