एपीआय, पीएसआयसह दहा कर्मचाऱ्यांना 'शो कॉज'

By Admin | Updated: September 3, 2014 23:00 IST2014-09-03T23:00:31+5:302014-09-03T23:00:31+5:30

पोलीस ठाण्याच्या वार्षिक अहवाल तपासणीत दोषी आढळलेल्या बडनेरा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक, तीन उपनिरीक्षकांसह दहा पोलीस कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.

'Show Cause' for ten employees with API, PSI | एपीआय, पीएसआयसह दहा कर्मचाऱ्यांना 'शो कॉज'

एपीआय, पीएसआयसह दहा कर्मचाऱ्यांना 'शो कॉज'

अमरावती : पोलीस ठाण्याच्या वार्षिक अहवाल तपासणीत दोषी आढळलेल्या बडनेरा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक, तीन उपनिरीक्षकांसह दहा पोलीस कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी ही कारवाई केली.
कुठलाही तक्रारकर्ता पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्यास त्याची तक्रार नोंदवून तक्रारकर्त्याला तक्रारीची दुय्यम प्रत देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निर्गमित केले आहे. परंतु बडनेरा पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक, तीन उपनिरीक्षकांसह कर्मचाऱ्यांनी तक्रारकर्तांना तक्रार दाखल केल्याची प्रत दिली नाही. काही जणांनी पोलीस ठाण्यातील क्राईम रजिस्टरमध्ये रीतसर वार्षिक नोंदी घेतल्या नाहीत. पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी बडनेरा पोलीस ठाण्याचे वार्र्षिक निरीक्षण केल्यानंतर त्यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी ३० आॅगस्ट रोजी बडनेरा पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक गजानन मेहत्रे, उपनिरीक्षक नरेंद्र पेंदोर, विलास पवार, विजय चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश कोकाटे, रामराव बडे यांच्यासह पोलीस कर्मचारी राजू मोहोड, विजय अडोकार, प्रशांत कात्रे, विजय सावरकर या दहा जणांना ५०० रुपये दंड का ठोठावण्यात येऊ नये या आशयाची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यातील काहींची सध्या दुसऱ्या पोलीस ठाण्यात नियुक्ती आहे. या नोटीशीचे उत्तर देण्यासाठी काही दिवसांचा अवधी देण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

Web Title: 'Show Cause' for ten employees with API, PSI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.