धक्कादायक! अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या अंडा बराकीत शिरला कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 07:00 IST2021-03-01T07:00:00+5:302021-03-01T07:00:32+5:30
Amravati news अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहातील अंडा बराकीत एक पुरुष बंदीजन कोरोना संक्रमित आढळला आहे. अतिसंरक्षित असलेल्या अंडा बराकीत कोरोना शिरला कसा, याबाबत कारागृह प्रशासन चिंतातुर झाले आहे.

धक्कादायक! अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या अंडा बराकीत शिरला कोरोना
गणेश वासनिक
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहातील अंडा बराकीत एक पुरुष बंदीजन कोरोना संक्रमित आढळला आहे. अतिसंरक्षित असलेल्या अंडा बराकीत कोरोना शिरला कसा, याबाबत कारागृह प्रशासन चिंतातुर झाले आहे. आजमितीला कारागृहात १० पुरुष, तर एक महिला बंदीजन कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यामुळे कारागृहात समूह संक्रमणाचा धोका वाढल्याचे बोलले जात आहे.
यातील एक बंदीजन येथील शासकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. नऊ बंदीजन येथील होमगार्डच्या विभागीय कार्यालयात साकारलेल्या कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपचार घेत आहेत तसेच एक महिला बंदी शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेच्या मुलींच्या वसतिगृहात कोविड हेल्थ सेंटरमध्ये दाखल आहे. अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा हैदोस वाढला आहे. फेब्रुवारीत कोरोना संक्रमिताची वाढती संख्या बघता, जिल्हा प्रशासनाने २२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान ‘लॉकडाऊन’ जाहीर केला होता.
दरम्यान, पॉझिटिव्ह रुग्ण आणि मृतांची संख्या कमी होण्याचे चिन्हे दिसून येत नसल्याने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पुन्हा ८ मार्चपर्यंत ‘लॉकडाऊन’ घोषित केला आहे. कारागृहात कोरोना नियमावलींचे कोेटेकाेर पालन होत असताना अंडा आणि सामान्य बराकीत प्रत्येकी एक असे दोन बंदीजन बाधित आढळले आहे. १ मे २०२० ते ३१ जानेवारी २०२१ या दरम्यान कारागृहात १६५ कैदी संक्रमित आढळले होते. त्यापैकी एक कर्मचारी, एक कैदी असे दोघांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
नवीन कैदी १४ दिवस क्वारंटाईन
न्यायालयाच्या आदेशानुसार, विविध गुन्ह्यांतील आरोपींची कारागृहात रवानगी झाल्यानंतर हल्ली कोरोनाकाळात १४ दिवस संबंधित कैद्याला क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना चाचणीनंतर जुने कारागृहात रवानगी केली जाते. तरीही अंडा बराकीत कोरोना पोहाेचला कसा, ही बाब चिंतनीय ठरत आहे. येथील अंध विद्यालयात नव्या बंदीजनांसाठी क्वारंटाईन केंद्र साकारण्यात आले आहे.
अंडा बराकीत पाकिस्तानी, बॉम्बस्फोटचे आरोपी, नक्षलवादी
अमरावती मध्यवर्ती कारागृहाचे अंडा बराक अतिसंरक्षित आहे. मुख्य प्रवेशद्वारापासून सात प्रवेशद्वार पार केल्यानंतर अंडा बराकीत जाता येते. अंडा बराकीत खून खटल्यातील एका बंदीजनास कोरोनाने ग्रासले आहे. त्यामुळे अंडा बराकीत कुणामुळे कोरोनाचा संसर्ग पोहोचला, हे शोधून काढणे आव्हानात्मक आहे. हल्ली अंडा बराकीत पाकिस्तानी, बॉम्बस्फोटचे आरोपी, नक्षलवादी, देशद्रोही, खून खटल्यातील आरोपी असे एकूण १० बंदीजन जेरबंद आहेत. अंडा बराकीची क्षमता १६ एवढी आहे.
बंदीजनांची नियमित सर्दी, खोकला, तापाची तपासणी केली जाते. अंडा बराकीत कोरोना संक्रमित कैदी आढळून आल्याने चिंता वाढली आहे. कारागृहातून बाहेर बंदी जात नाही. किंबहुना अंडा बराकीत कर्मचारी संपर्कातून कोरोना पोहोचला असावा. त्या दिशेने चाचपणी केली जात आहे.
- एफ.आय. थोरात, वैद्यकीय अधिकारी, अमरावती मध्यवर्ती कारागृह