ओडिशातून शिवशाहीने आले, क्राईम टीमने पंचवटीत पकडले; दोघांना अटक, २६ किलो गांजा जप्त
By प्रदीप भाकरे | Updated: December 7, 2024 20:27 IST2024-12-07T20:26:25+5:302024-12-07T20:27:02+5:30
स्थानिक पंचवटी चौकात ६ डिसेंबर रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली. दोन्ही आरोपी तो गांजा घेऊन ओडिसाहून नागपूरला आले.

ओडिशातून शिवशाहीने आले, क्राईम टीमने पंचवटीत पकडले; दोघांना अटक, २६ किलो गांजा जप्त
अमरावती : दोन मोठ्या बॅगमध्ये गांजा घेऊन आलेल्या दोन तस्करांना गुन्हे शाखा युनिट एकने ट्रॅप रचत अटक केली. त्यांच्याकडून २६.१४५ किलो गांजा व अन्य साहित्यासह एकूण किंमत ५ लाख ३२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक पंचवटी चौकात ६ डिसेंबर रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली. दोन्ही आरोपी तो गांजा घेऊन ओडिसाहून नागपूरला आले. तेथून शिवशाहीत बसून ते स्थानिक पंचवटी चौकात उतरले, असे चौकशीदरम्यान उघड झाले आहे. दोन्ही आरोपी तो गांजा स्थानिक स्तरावर कुणाला विकणार होते, त्यांचे चेहरे उघड करण्याच्या दिशेने तपास केला जाईल, असे पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी शनिवारी प्रसिध्दीमाध्यमांना सांगितले.
शेखर संजय गडलिंग (वय २७, रा. निळकंठ शाळेजवळ, महाजनपुरा अमरावती) व सुनील सुधाकर वानखडे (वय ३९, रा. अडगाव, ता. मोर्शी) असे अटक गांजा तस्करांची नावे आहेत. त्यांना जप्त मुद्देमालासह गाडगेनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. यापूर्वी देखील ७ नोव्हेंबर रोजी क्राईम युनिट दोनच्या अधिकारी अंमलदारांनी पंचवटीस्थित पीडीएमसीजवळून दोघांना अटक करून त्यांच्याकडून ९.७३५ किलो गांजा जप्त केला होता. दरम्यान, शेखर गडलिंग हा त्याच्या एका साथीदारासह पंचवटी चौकस्थित डॉ. पंजाबराव देशमुख हॉस्पिटलजवळ गांजा बाळगून विक्रीसाठी येत असल्याची माहिती गस्तीवरील क्राईम वनला मिळाली होती. त्यानुसार, ६ डिसेंबर रोजी रात्री सापळा रचण्यात आला. त्यावेळी दोन इसम दोन मोठ्या बॅग घेऊन येत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांना घेराव घालून थांबविण्यात आले. झाडाझडतीदरम्यान त्यांच्याकडील बॅगमध्ये गांजा आढळून आला.
यांनी केली कारवाई -
पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, कल्पना बारवकर व सागर पाटील, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त शिवाजीराव बचाटे, गाडगेनगरचे सहायक पोलिस आयुक्त अरुण पाटील व गुन्हे शाखा युनिट-१ चे प्रमुख गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनीष वाकोडे, योगेश इंगळे व अनिकेत कासार यांच्यासह अंमलदारांनी ही कारवाई केली.
जनसंपर्क अधिकारी