शिवसेना ठाकरे गटाचा कृषी कार्यालयात ठिय्या; पीक विम्याचा घोळ, सर्व्हेअरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: December 26, 2023 20:00 IST2023-12-26T19:59:56+5:302023-12-26T20:00:13+5:30
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिवळे झालेले असताना येलो मोझॅक दाखविण्यात आला.

शिवसेना ठाकरे गटाचा कृषी कार्यालयात ठिय्या; पीक विम्याचा घोळ, सर्व्हेअरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिवळे झालेले असताना येलो मोझॅक दाखविण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना परतावा मिळालेला नाही. या सर्व सर्व्हेअरवर गुन्हा दाखल करण्यात यावा, यासह अन्य मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रकाश मारोटकर यांच्यासह शेतकऱ्यांनी एसएओंच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.
पावसामुळे खरिपाच्या पिकांचे सारखेच नुकसान झालेले असताना पीक विमा भरपाईत मात्र प्रचंड तफावत आहे. विमा प्रतिनिधीद्वारा शेतकऱ्यांना पैशांची मागणी करण्यात आली. ज्या शेतकऱ्यांनी पैसे दिलेत, त्यांच्या शेतात नुकसान जास्त दाखविण्यात आले व ज्यांनी दिले नाहीत, त्यांचे नुकसान कमी दाखविल्याने त्यांना भरपाई मिळालेली नसल्याचा आरोप मारोटकर यांनी केला. त्यामुळे या सर्व सर्व्हेअरवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांच्याकडे केली.