'३६ दिवस पाखळले-पाखळले, काहीच नाही सापडले.. शेवटी आले येथेच'! अमरावतीत शिवसेना आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2022 14:23 IST2022-05-28T13:53:40+5:302022-05-28T14:23:29+5:30
अमरावतीत राणांच्या विरोधात शिवसेनेने बॅनरबाजी करत त्यांचा विरोध दर्शविला. बेरोजगारी, महागाई विरोधात राणा दाम्पत्य का बोलत नाही? असा सवालही शिवसेनेने उपस्थित केलाय.

'३६ दिवस पाखळले-पाखळले, काहीच नाही सापडले.. शेवटी आले येथेच'! अमरावतीत शिवसेना आक्रमक
नागपूर : राणा दाम्पत्य हे नागपुरात पोहोचले आहेत. पोलिसांनी त्यांना काही अटी-शर्तींसह हनुमान चालीसा पठणाला परवानगी दिली आहे. राम मंदिरात हनुमान चालीसा पठण करून ते अमरावतीकडे निघणार आहेत. अमरावतीतही समर्थकांनी राणा दाम्पत्याच्या स्वागताची जोरदार तयारी केली आहे. तर, दुसरीकडे राणांच्या विरोधात शिवसेनेने बॅनरबाजी करत त्यांचा विरोध दर्शविला आहे. शहरात काही ठिकाणी त्यांच्या विरोधातील पोस्टर्स लावण्यात आले आहेत. '३६ दिवस पाखळले-पाखळले, काहीच नाही सापडले.. शेवटी आले येथेच'! अशा आशयाचे बॅनर अमरावती शहरातील पंचवटी चौकात लावण्यात आले आहेत.
हनुमान चालीसा प्रकरणानंतर राणा दाम्पत्य हे शनिवारी ३६ दिवसानंतर अमरावती जिल्हात येत आहेत. त्यासाठी राणा दाम्पत्याचे स्वागत करण्यासाठी युवा स्वाभिमान समर्थक सज्ज झाले आहेत. हनुमान चालीसा वाचणे म्हणजे राजद्रोह आहे का? असे असेल तर एकदा नव्हे हजारदा आम्ही हनुमान चालीसा वाचू, असे म्हणणाऱ्या राणा दाम्पत्याचे स्वागत, अशा आशयाचे बॅनर युवा स्वाभिमानकडून लावण्यात आले आहेत. तर, दुसरीकडे शिवसेनेने बॅनरबाजी करत विरोध दर्शविलाय. ३६ दिवसात अमरावती जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाले असून जिल्ह्याचा विकास खुंटला असा आरोप अमरावतीच्या शिवसेना नेत्यांनी केलाय. यासह बेरोजगारी, महागाई विरोधात राणा दाम्पत्य का बोलत नाही ? असा सवाल शिवसेनेने उपस्थित केलाय. यावर युवा स्वाभिमानकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नागपुरातही ठिकठिकाणी राणा दाम्प्त्याच्या स्वागतासाठी पोस्टर्स लावण्यात आले होते. पण नागपूर मनपाच्या पथकाकडून ते पोस्टर्स, बॅनर्स काढण्यात आले आहेत. राणा दाम्पत्य व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हनुमान चालीसा पठणावरून आमनेसामने आहेत. दोन्ही गटांकडून एकाच मंदिरात हनुमान चालीसा पठण होत असल्याने शहरातील वातावरण तापले आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये, यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. रामनगरमधील हनुमान मंदिर परिसरात पोलिसांना मोठा बंदोबस्त आहे.