वरुड तालुक्यात शहीद स्मारकांची दुरवस्था
By Admin | Updated: March 15, 2016 00:38 IST2016-03-15T00:38:58+5:302016-03-15T00:38:58+5:30
स्वातंत्र्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहिदांच्या आठवणी काळाच्या ओघात हद्दपार होत आहेत.

वरुड तालुक्यात शहीद स्मारकांची दुरवस्था
स्वातंत्र्य संग्रामाच्या स्मृतींवरच कुठाराघात : जतन करण्याची जबाबदारी कुणाची?
संजय खासबागे वरूड
स्वातंत्र्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहिदांच्या आठवणी काळाच्या ओघात हद्दपार होत आहेत. शहीद स्मृती स्मारकांचीच प्रचंड दुरवस्था झाली आहे. या शहीद स्मारकांमध्ये चक्क तलाठी कार्यालये थाटलेली आहेत. स्मारकांच्या आणि खचलेल्या भिंती अतिशय जीर्ण झाल्या आहेत. तालुक्यातील चार शहीद स्मारकांकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
ब्रिटिशांच्या जोखडातून देशाला मुक्त करण्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या आणि डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे व्हावे, यासाठी बलिदान देणाऱ्या शहीदांचा इतिहास वरुडला लाभला आहे. तालुक्यात १४० गावांचा विस्तार असून १२० वसलेल्या आणि २० उजाड गावांचा यात समावेश आहे. या गावांचा अंदाजे ४२ तलाठी कारभार पाहत आहेत. येथे सात महसुली मंडळ आहेत. यामध्ये वरुड भाग-१ आणि २, शेंदूरजनाघाट, पुसला, राजुराबाजार, बेनोडा, लोणी, वाठोडा चांदस या गावांचा समावेश आहे. शेंदूरजनाघाट, पुसला आणि राजुराबाजार वगळता तलाठ्यांना हक्काची जागा नसल्याने वरुड, लोणी येथे शहीद स्मारकामध्येच तलाठी कार्यालये थाटली आहेत. बेनोडा येथील शहीद स्मारकात वाचनालय असल्याचे चित्र आहे. इत्तमगांवचे शहिदस्मृती स्मारक ओस पडले आहे. एका तलाठ्याकडे चार ते पाच गावांचा कारभार असल्याने एकाच ठिकाणी सुविधा नागरिकांना मिळावी म्हणून शहीद स्मारके ‘हायजॅक’ करण्यात आली. युवा पिढीला शहिदांचे योगदान कळणे आवश्यक आहे. येथे वाचनालय किंवा फोटो प्रदर्शनी असली तर शहिदांच्या आठवणी जागृत राहतील. परंतु शासन, प्रशासन केवळ खाबुगिरीत गुंतल्याने शहिदांच्या आठवणी केवळ १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी तसेच १ मे या दिवसांपुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत. या शहीद स्मारकांची उपेक्षा तातडीने थांबविण्याकरिता गांभीर्याने पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
शहीद स्मारकातील तलाठ्यांची कागदपत्रे बेवारस
राज्य शासनाने शहिदांच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधलेल्या षट्कोणी स्मारकाच्या सभोवताल भिंती नसून जाळया लावण्यात आल्या आहेत. खुल्या वातावरणात येथे असलेले महसुली दस्तऐवज मात्र आजही बेवारस स्थितीत आहेत. याकडे महसूल विभागासह राज्य शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
शेतकऱ्यांचे सातबारे असुरक्षित
तालुक्यात इत्तमगाव, लोणी आणि बेनोडा येथे शहीद स्मारके बांधण्यात आलीत. शहिदांच्या स्मृती जागृत ठेवण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न होता. मात्र, या प्रयत्नालाच तिलांजली देण्याचा प्रकार शासनकर्ते करीत आहेत. तलाठी कार्यालयातील सातबारे आणि महसुली कागदपत्रे असुरक्षित असल्याने शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या कागदपत्रांची जोखीम कोण पत्करणार, हा चिंतेचा विषय निर्माण झाला आहे.