अपंगांना मिळणार शबरी, रमाई योजनेतून घरकूल
By Admin | Updated: December 24, 2015 00:25 IST2015-12-24T00:25:16+5:302015-12-24T00:25:16+5:30
राज्यातील अपंग बांधवांना शबरी आणि रमाई घरकूल योजनेचा लाभ मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधिमंडळात केली.

अपंगांना मिळणार शबरी, रमाई योजनेतून घरकूल
मुख्यमंत्र्यांची घोषणा : बच्चू कडू यांचे प्रयत्न सार्थकी
अमरावती : राज्यातील अपंग बांधवांना शबरी आणि रमाई घरकूल योजनेचा लाभ मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधिमंडळात केली. यात बीपीएलची अट राहणार नसल्याचे जाहीर करण्यात आले. आमदार बच्चू कडू यांनी अपंगांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मांडला असता मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
शबरी घरकूल योजना ही अनुसूचित जमाती तर रमाई घरकूल योजना ही अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राबविली जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे बीपीएल प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. आमदार बच्चू कडू यांनी अपंगांचे पुनर्वसन प्रश्न विधिमंडळात रेटून धरताना आदिवासी अथवा अनुसूचित जाती प्रवर्गातील अपंग बांधवांना घरकुलचा लाभ मिळावा, ही मागणी रेटून धरली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी स्वत: मान्य करून बिपीएलची अट वगळून शबरी आणि रमाई घरकूल योजनेचा लाभ अपंग बांधवांना १ जानेवारी नवीन वर्षांपासून दिला जाईल, अशी घोषणा केली. शबरी घरकूल योजना ही आदिवासी विकास विभाग तर रमाई घरकूल योजना ही सामाजिक न्याय विभागाकडून राबविली जाईल, हे स्पष्ट केले. तसेच ओबीसी, खुल्या प्रवर्गातील अपंग बांधवांसाठी येत्या दोन महिन्यांत संत गाडगेबाबा यांच्या नावाने घरकूल योजना राबविली जाईल, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्यात ७० ते ८० लाख अपंगांची संख्या आहे. शबरी, रमाई घरकुल योजनेतून १५ ते २० लाख अपंगांना लाभ मिळेल. गत काही वर्षांपासूनचा अपंगांच्या पुनर्वसनाचा लढा सुरू असताना आज तो मार्गी लागला आहे. ओबीसी व खुल्या प्रवर्गासाठी घरकुल योजना लवकरच सुरू होईल.
- बच्चू कडू, आमदार, अचलपूर