सात लाख अधिकार अभिलेख ‘आॅनलाईन’
By Admin | Updated: March 23, 2015 23:59 IST2015-03-23T23:59:41+5:302015-03-23T23:59:41+5:30
सात लाख अधिकार अभिलेख (सातबारा) अद्ययावत करुन आॅनलाईन फेरफार सुरु करण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आहे

सात लाख अधिकार अभिलेख ‘आॅनलाईन’
अमरावती : सात लाख अधिकार अभिलेख (सातबारा) अद्ययावत करुन आॅनलाईन फेरफार सुरु करण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आहे ई-फेरफार आज्ञावली साठी सहा तालुक्यातील अद्ययावत आॅनलाईन फेरफार करण्यात आलेल्या सीडी पुणे येथे जमा बंदी आयुक्तांकडे पाठविण्यात आलेल्या आहे. अमरावती वगळता उर्वरित सात तालुक्यातील डाटा एंट्री पूर्ण झाल्याने ३१ मार्च २०१५ नंतर हस्तलिखित सातबार आता इतिहासजमा होणार आहे. ही प्रक्रियेची अंमलबजावणी करणारा अचलपूर तालुका जिल्ह्यात प्रथम ठरला आहे.
राष्ट्रीय भूमि अभिलेख आधूनिकीकरण कार्यक्रमांतर्गत (ई-धरती) जिल्ह्यात ई-फेरफार या उपक्रमाची अंमलबजावनी सुरु आहे. या अंतर्गत महसूल विभागाने नोंदणी विभाग, महसूल विभाग व भूमि अभिलेख विभाग यांचे परस्परांसी दस्तनोंदणी व फेरफार नोेंदी विषयक कामकाज संलग्न केले आहे. नोंदणी विभागाकडे हस्त नोंदविली जाताच तात्काळ महसूल विभागाकडे त्याच्या फेरफाराची प्रक्रिया सुरु होऊन आॅनलाईन पार पाडल्या जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील १९८१ गावामधील ७ लाख सातबारा, अद्यावत करण्यात येऊन डाटा एंट्री करण्यात आल्या आहेत.
फेरफारची नोंद आॅनलाईन करण्यासाठी महसूल विभागाने ३१ मार्च ही डेडलाईन दिली असल्याने १ एप्रिलपासून हस्तलिखित सातबारा इतिहासजमा होणार आहे. जिल्ह्यात अमरावती तालुक्यामधील २ लाख ३० हजार सातबारापैकी ८० हजार सातबाऱ्याची डाटा एंट्री वगळता जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची डाटा एंट्री पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चिखलदरा, दर्यापूर, चांदूरबाजार, तिवसा येथील सातबारा डाटाएंट्री झालेल्या सीडी या जमाबंदी पूर्ण यांच्याकडे ट्रायलसाठी पाठविण्यात आलेल्या आहेत. याचा अहवाल व पडताळणी नंतर या सीडी पूर्ण येथील सुचना व विज्ञान केंद्र (एनायसी) येथे तपासनी करीता जाणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना संगणकीकृत सातबारा मिळणार आहे.
शेतकऱ्यांना शेतीचा सातबारा आठ ‘अ’ चा उतारा, फेरफार नक्कल मिळविण्यासाठी तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असे त्यामूळे तलाठी कार्यालयाचे कामकाज पेपरलेस करण्यासाठी शासनाने ही महत्त्वाकांक्षी उपक्रम दोन वर्षापासून राबविला.
अंतिम टप्प्यामधील आठ दिवसात काम पूर्ण होऊन शेतकऱ्यांना संगणकीकृत सातबारा मिळणार आहे. ई-धरती या उपक्रमाची अंमलबजावनी करण्यात अचलपूर व तिवसा तालुके अव्वल ठरले आहेत. जिल्ह्यात १९८१ गावामध्ये ७ लाख ३३ हजार २३० सात बारांची संख्या आहे.
यामध्ये अमरावती तालुक्यामधील ८० हजार अधिकतर अभिलेखांची नोंदणी अद्याप व्हायची आहे.
उर्वरित सर्व तालुक्यामधील तलाठी कार्यालयाचे दस्तऐवजाची डाटाएंट्री झाले असून ट्रायल घेण्यात आली. येत्या १ एप्रिल नंतर शेतकऱ्यांना संगणकीकृत सातबारा मिळणार आहे.
शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी निर्णय
राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाअंतर्गत (ई-धरती) महसूल नोंदणी व भूमिअभिलेख विभागाच्या नोदी कामकाज संलग्न केले आहे. त्यामुळे उपनिबंधक कार्यालयात खरेदी व्यवहार पूर्ण होताच तात्काळ महसूल विभागाकडे त्याच्या फेरफाराची प्रक्रिया आॅनलाईन पार पडनार असल्याने खरेदी व्यवहाराचे ‘नोटेशन’ आहे शेतकऱ्यासाठी हा निर्णय क्रांतीकारी ठरला आहे.
अचलपूर तालुक्यात
ई-फेरफारला सुरुवात
जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात अधिकार अभिलेख (सातबारा)अद्यावत करुन आॅनलाईन फेरफार सुरु करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आॅनलाईन ई-फेरफार करणारा हा जिल्ह्यातील प्रथम तालुका ठरला आहे. तिवसा तालुका दुसऱ्या स्थानी आहे. या पाठोपाठ अंजनगांव सुर्जी, चिखलदरा, दर्यापूर, चांदूर बाजार या तालुक्याची प्रक्रिया पूर्ण होऊन ट्रायल सुरु आहे.
जिल्ह्यातील अधिकार
अभिलेख संख्या
जिल्ह्यात १९८१ गावात ७ लाख ३३ हजार २६० अधिकार अभिलेख (सातबारा) आहेत. यामध्ये अमरावती २३००९६, भातकुली ३१०१७, नांदगांव खंडेश्वर ४४२००, चांदूर रेल्वे २५९१७, धामणगांव रेल्वे ३३७८८, तिवसा ३०९०४, मोर्शी ४९४१४, वरुड ५२८८३, अचलपूर ५१८१५, चांदूर बाजार ४७८९९, दर्यापूर ४७०७५, अंजनगांव ३२७०६, धारणी ३२२८० असी संख्या आहे यापैकी ७ लाख सातबाऱ्यांची डाटा एंट्री झाली आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यामधील अद्यावत नोंदी असलेल्या अधिकार अभिलेख्यांची सीडी जमाबंदी आयुक्त पुणे यांच्याकडे पाठविल्या आहेत. अमरावती वगळता उर्वरित तालुक्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहेत. शेतकऱ्यांना एक एप्रिलनंतर संगणकीकृत सातबारा मिळणार आहे.
शंकर शिरशुध्दे, उपजिल्हाधिकारी (महसूल)