अमरावतीत पोलीस शिपायासह सात जण संक्रमित; कोरोनाग्रस्तांची संख्या १०१
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 20:50 IST2020-05-16T20:50:13+5:302020-05-16T20:50:35+5:30
अमरावती जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने होत आहे. शनिवारी एका पोलीस शिपायासह सहा पुरुष व एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या आता १०१ वर पोहोचली आहे.

अमरावतीत पोलीस शिपायासह सात जण संक्रमित; कोरोनाग्रस्तांची संख्या १०१
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने होत आहे. शनिवारी एका पोलीस शिपायासह सहा पुरुष व एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या आता १०१ वर पोहोचली आहे. उपचारानंतर बरे झाल्याने सहा व्यक्तींना शनिवारी सायंकाळी घरी सोडण्यात आले. कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या आता ६२ झाली आहे.
शनिवारी येथील गाडगेनगर ठाण्याचा एक पोलीस शिपायाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ठाणेदारासह १५ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे थ्रोट स्वॅब तपासणीला पाठविण्यात येणार आहे. अहवाल येईस्तोवर त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी सांगितले. सध्या या शिपायावर नागपूर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहे. बडनेरा येथील कुरेशीनगरातील २३ वर्षीय युवक, लालखडी येथील ६० वर्षीय महिला, मसानगंज येथील ४८ वर्षीय पुरुष व पाटीपुरा येथील ३० वर्षीय युवकाचा, तसेच रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार लालखडी येथील २८ वर्षीय तरुण व सिंधूनगरातील ५५ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने त्यांना येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.