भात, तूर, ज्वारी, मूग, उडदाचा पेरा वाढला

By Admin | Updated: July 21, 2016 00:10 IST2016-07-21T00:10:57+5:302016-07-21T00:10:57+5:30

आठवडाभर संततधार पावसाने मेळघाटातील पीक परिस्थिती सुधारली असून गतवर्षीपेक्षा भात, तूर, ज्वारी, मूग, उडिद, मका आदी पिकांचा पेरा तालुक्यात वाढला आहे.

Sesame, tur, sorghum, moong and urad have increased | भात, तूर, ज्वारी, मूग, उडदाचा पेरा वाढला

भात, तूर, ज्वारी, मूग, उडदाचा पेरा वाढला

सोयाबीन क्षेत्र घटले : पावसाने मेळघाटातील पिकांना जीवदान
चिखलदरा : आठवडाभर संततधार पावसाने मेळघाटातील पीक परिस्थिती सुधारली असून गतवर्षीपेक्षा भात, तूर, ज्वारी, मूग, उडिद, मका आदी पिकांचा पेरा तालुक्यात वाढला आहे. त्यामुळे परंपरागत समजल्या जाणाऱ्या सोयबीन पिकांची पेरणी प्रथमच घटल्याची आकडेवारी आहे.
मेळघाटच्या दऱ्याखोऱ्यात नागवळी वळणावर वसलेल्या खेड्यांप्रमाणेच डोंगर कपारीवर, आदिवासींची शेतजमीन आहे. कोरडवाहू शेतीमध्ये वर्षातून एक पीक त्यांना घ्यावे लागते. मोजक्याच ठिकाणी ओलिताची सोय विहिरीतून असली तरी उन्हाळ्यात पाण्याची पातळी खालवत असल्याने सिंचनाचा गंभीर प्रश्न येथे कायमच आहे.
स्थलांतरातून बियाण्यांची सोय
तालुक्यातील आदिवासी सर्वाधिक प्रमाणात रोजगारासाठी शहराच्या ठिकाणी स्थलांतरीत होतात. वर्षभर पाठीवर बिऱ्हाड घेऊन परिवारासह कामाच्या शोधात ते भटकंतीवर असतात. होळी हा त्यांचा महत्त्वाचा सर्वात मोठा सण वगळता आदिवासी मान्सूनच्या सरी कोसळण्यापूर्वी आपल्या गावी परतात. रोजगारातून परिवाराच्या पोटचा प्रश्न व त्यातून कोरडवाहू शेतीसाठी बी-बियाण्यांची व्यवस्था करण्याची त्यांची पद्धत आहे. आदिवासी गत वर्षीपर्यंत सर्वाधिक पसंद सोयाबीन पिकाला देत होते. मात्र यावर्षी चित्र काही वेगळे आहे.
भात व कडधान्याला सर्वाधिक पसंती
चिखलदरा तालुक्यातील पर्जन्यमान भात पिकासाठी सुद्धा योग्य असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. हतरु, काटकुंभ मंडळातर्फे येणाऱ्या काही गावांमध्ये भात पीक घेण्यात येते. गतवर्षी १२३८ हेक्टरवर भात पिकासाठी लागवड करण्यात आली होती. यावर्षी १३८७ हेक्टरवर, त्याचप्रमाणे (कंसातील आकडे गतवर्षीचे), ज्वारी ४९५२ हेक्टर (गतवर्षी ३८८५ हेक्टर), मका ४८० हेक्टर (गतवर्षी ३१० हेक्टर), तूर २१७४ हेक्टर (गतवर्षी १६२३ हेक्टर),उडिद २४८ हेक्टर (गतवर्षी १०५ हेक्टर), मूग ४०३ हेक्टर (२३ हेक्टर), सोयाबीन ११३४९ हेक्टर (गतवर्षी १४२९८ हेक्टर) यावर्षी कमी पेरा झाला तर भुईमूग ८४७ (गतवर्षी ९८०), कापूस ७१८ हेक्टर (७७५ हेक्टर), मिरची २८५ हेक्टर (गतवर्षी २५८) वर पेरणी करण्यात आले. चिखलदरा तालुक्यात एकूण ५६,७२३ हेक्टर क्षेत्रापैकी पेरणीयोग्य क्षेत्र २५,२५४ हेक्टर एवढे आहे. (तालुका प्रतिनिधी)

पीक परिस्थिती चांगली
तालुक्यात आतापर्यंत झालेल्या पावसामुळे पीक परिस्थिती चांगली असून काटकुंभ परिसरात दरवर्षी सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात केसाळ अळीचा प्रादूर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. यावर्षी मात्र सोयाबीनचा पेरा कमी झाला असून कडधान्याला आदिवासींनी पसंती दर्शविली आहे. शेतातील पिकांमध्ये निंदन आणि खत टाकण्याचे काम सुरू असल्याचे चित्र आहे.

डोंगरदऱ्यात पेरणीची पद्धत
तालुक्यात मोजकाच भाग सोडला तर खडकाळ आणि डोंगरदऱ्यावर आदिवासींची शेत जमीन आहे. उतारीच्या भागात पेरणी करण्याची पद्धत असून पेरणी होताच मुसळधार पाऊस झाला तर बियाणे वाहून गेल्याचा अनुभव आदिवासी शेतकऱ्यांना आहे. खडकाळ जमिनीतून पीक घेण्याची अनोखी पद्धत येथे आहे.

तालुक्यात पीक परिस्थिती सुद्धा चांगली आहे. सोयाबीनचा पेरा घटला असून तूर,मूग, उडिद आदी पिकांचा पेरा वाढला आहे. सध्याच्या प्रादूर्भाव झाल्यास कृषी विभागामार्फत तज्ज्ञांचे मार्गदर्शन आदिवासी शेतकऱ्यांना दिल्या जाते.
- गणेश माडेवार
तालुका कृषी अधिकारी, चिखलदरा

Web Title: Sesame, tur, sorghum, moong and urad have increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.