विद्रुपा नदीत केमिकल मिसळल्याने खळबळ
By Admin | Updated: July 26, 2014 20:59 IST2014-07-26T20:59:21+5:302014-07-26T20:59:21+5:30
मनात्री परिसरात विद्रुपा नदीत मोठय़ा प्रमाणात केमिकल मिसळल्याने परिसरातील पाणी दूषित झाले

विद्रुपा नदीत केमिकल मिसळल्याने खळबळ
मनात्री: तेल्हारा तालुक्यातील मनात्री परिसरात विद्रुपा नदीत मोठय़ा प्रमाणात केमिकल मिसळल्याने परिसरातील पाणी दूषित झाले असून, जनावरे दगावण्याची भीती निर्माण झाली आहे. वरिष्ठ अधिकार्यांनी वेळीच उपाययोजना न केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेल्हारा तालुक्यातील मनात्री परिसर हा नदीकाठचा भाग असून, या ठिकाणी अनेक वीटभट्टय़ा आहेत. वीटभट्टय़ांमध्ये वापरण्यासाठी मोठय़ा प्रमाणात केमिकल आणण्यात येते; परंतु बुधवारी अचानक विद्रुपा नदीला पूर आल्याने या परिसरात पाणी शिरले आणि केमिकलचा साठा पाण्यात मिसळला. या प्रकारामुळे परिसरातील पाणी काळे झाले आहे. पाच वर्षाआधी गावात अशाच प्रकारचे केमिकल पुरामध्ये मिसळल्यामुळे गावातील २५ जनावरांचा मृत्यू झाला होता. पुन्हा तीच स्थिती असल्यामुळे पशुपालक धास्तावले आहेत. मनात्री परिसरात वीटभट्टय़ांवर मनमानी पद्धतीने काम चालते. संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने मोठय़ा प्रमाणात केमिकलचा वापर या भट्टय़ांमध्ये होत आहे. या परिसरातील पाणी केमिकलयुक्त झाल्यामुळे जनावरांना धोका निर्माण झाला आहे.
** विद्रुपा नदीमुळे नदीकाठची जमीन वाहून गेली असून, यामध्ये शेतकर्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. सुरेश पोटे नामक शेतकर्याचे पाईप व पंप वाहून गेले. महादेव वानखडे या शेतकर्याची जमीन खरडून गेली. महागड्या बियाण्यांची पेरणी केली असली तरी पिके वर येण्याची सुतराम शक्यता नाही. पाण्यामुळे मनात्री, पंचगव्हाण, डवला तळेगाव या गावांचा संपर्क तुटला होता. मनात्री गावातील सुनील डायलकर, गजानन वाघोडे, महादेव वानखडे, कैलास वानखडे, सुरेश पोटे, बाळू काळमेघ, श्रीकृष्ण वानखडे, बाळकृष्ण वानखडे, अनिल वानखडे यांचे नुकसान झाले आहे.