मेडिकलमधून औषधीसह दारूविक्री
By Admin | Updated: March 14, 2016 00:02 IST2016-03-14T00:02:28+5:302016-03-14T00:02:28+5:30
मेडिकल प्रतिष्ठानातून औषधींसह कॉस्मेटिक्स आणि अन्य वस्तुंची विक्री होत असतानाच एका संचालकाने जोडधंदा म्हणून चक्क मेडिकलमधूनच दारूविक्रीचा व्यवसाय ...

मेडिकलमधून औषधीसह दारूविक्री
टाऊनशिपमधील प्रकार : नांदगाव ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार
अमरावती : मेडिकल प्रतिष्ठानातून औषधींसह कॉस्मेटिक्स आणि अन्य वस्तुंची विक्री होत असतानाच एका संचालकाने जोडधंदा म्हणून चक्क मेडिकलमधूनच दारूविक्रीचा व्यवसाय सुरूकेल्याचा खळबळजनक प्रकार कठोरा नाका परिसरातील टाऊनशिपमध्ये उघडकीस आला. याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल करून गुन्हेदेखील नोंदविले आहेत.
मेडिकलमधून दारूविक्री करणाऱ्या गजेंद्र उंबरकर या तरुणाने दारू घेण्यासाठी आलेल्या तरुणावर लोखंडी सळाख व कुऱ्हाडीने हल्ला केला. हा प्रकार १२ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडल्याचे तक्रारकर्ता धीरज गणेश भिलावे (२९, रा. पंचशीलनगर, रहाटगाव) यांनी म्हटले आहे. तक्रारीनुसार गजेंद्र उंबरकर हा कठोरा मार्गावरील पोटे टाऊनशिपमध्ये मेडिकल स्टोअर्स चालवितो आणि याच मेडिकलमधून दारूविक्रीचा व्यवसाय करतो. शनिवारी दुपारी धीरज भिलावे याने उंबरकरचे मेडिकल शॉप गाठून दारूच्या बाटलीची मागणी केली. मात्र, किमतीवरून दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी आरोपी गजेंद्र याने धीरजला अश्लील आणि जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने लोंखडी सळाख व कुऱ्हाडीने धीरजच्या हातावर व डोक्यावर प्रहार केला. धीरजला तातडीने रूग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास धीरज भिलावेकडून नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी गजेंद्र उंबरकरविरुध्द कलम ३२४, २९४, भादंविसह अॅट्रॉसिटी अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पोटे टाऊनशिपसारख्या गजबजलेल्या परिसरात मेडिकलच्या आडून दारूविक्रीच्या गोरखधंद्याला अभय कुणाचे, हा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
गजेंद्रकडूनही तक्रार
धीरज भिलावे याने तक्रार नोंदविल्यानंतर गजेंद्र जयकुमार उंबरकर यानेही नांदगाव पेठ पोलीस ठाणे गाठून धीरज भिलावेविरुध्द तक्रार नोंदविली. तक्रारीनुसार धीरज भिलावे व पिंटू कंत्राटदार या दोघांनी दारूच्या पावट्या मागितल्या. त्यावर नकार दिल्याने धीरज व पिंटू या दोघांनी शिवीगाळ करून काठीने मारहाण केली, असे गजेंद्रने म्हटले आहे. गजेंद्रच्या तक्रारीवरून धीरज आणि पिंटू या दोघांविरुध्द भादंविच्या कलम ३२४, २९४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांचा तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
मेडिकल स्टोअर्समध्ये दारूविक्री केली जात होती. त्यामुळे दारुची जादा किमतीत विक्री केल्याच्या वादावरून दारूविक्रेता व ग्राहकांमध्ये वाद झाला. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. आरोपी रुग्णालयात दाखल असल्यामुळे त्याला अद्याप अटक करण्यात आली नाही. पुढील चौकशी सुरु आहे.
- अनिल किनगे, पोलीस निरीक्षक, नांदगाव पेठ पोलीस ठाणे.