आय.टी.आय.च्या ६६ विद्यार्थ्यांची सुझुकी मोटर्समध्ये निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:39 IST2020-12-17T04:39:22+5:302020-12-17T04:39:22+5:30
दर्यापूर : पिंपळोद एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित अशासकीय आय.टी.आय. पिपंळोद व बाभळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यातून तब्बल ...

आय.टी.आय.च्या ६६ विद्यार्थ्यांची सुझुकी मोटर्समध्ये निवड
दर्यापूर : पिंपळोद एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित अशासकीय आय.टी.आय. पिपंळोद व बाभळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यातून तब्बल ६६ विद्यार्थ्यांची निवड सुझुकी मोटर्स या नामांकीत कंपनीने केली आहे. सामान्य शेतकरी कुटुंबातील असणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड झाल्यामुळे संस्थेने त्यांच्या कौतुक निरोप समारंभाचे आयोजन केले होते. ११ डिसेंबर रोजी गुजरात येथील नामांकित कंपनी सुजुकी मोटर्स यांच्याकडून बाबळी येथील अशासकीय आयटीआय येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात अमरावती व अकोला जिल्ह्यातील विविध तालुक्यातून फिटर, मोटर मेकॅनिक, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, वायरमन, श्रेणीतील प्रशिक्षित १५० विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी एच. आर. व्ही. एस. या प्लेसमेंट कंपनीकडून लेखी परीक्षा व प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात आली. यामधून ६६ विद्यार्थ्यांची कंपनीमार्फत नेमणूक करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक व निरोप समारंभ सोमवारी पिंपळोद एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष शंकरराव तिजारे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या प्रशासकीय इमारतीत घेण्यात आला. जिल्हा परिषद आरोग्य सभापती बाळासाहेब हिगंणीकर, सोसायटीचे सचिव रंगराव भुते, संचालक सुभाषराव गोळे, नानासाहेब डोरस, अर्चना वाघझाडे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे प्राचार्य अतुल चर्हाटे यांनी प्रास्ताविक, तर राजेश वायझाडे यांनी संस्थेच्यावतीने शुभेच्छापर मार्गदर्शन केले. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थिंनी गुजरात येथे कंपनीच्या बसमधून प्रस्थान केले. त्यावेळी पिंपळोद एज्युकेशन सोसायटीच्या परिवाराने व विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना शुभेच्छा निरोप दिला. संस्थेचे प्रफुल्ल चर्हाटे, रवि गोळे, यांच्यासह कर्मचार्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.