जलयुक्त शिवारसाठी २९४ गावांची निवड
By Admin | Updated: January 6, 2016 00:21 IST2016-01-06T00:21:31+5:302016-01-06T00:21:31+5:30
शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनेपैकी एक असलेली जलयुक्त शिवार अभियानांंतर्गत सन २०१६ करिता २९४ गावांची निवड झाली ....

जलयुक्त शिवारसाठी २९४ गावांची निवड
गतवर्षी चार हजार कामे : ४२ कोटींच्या निधीतून होणार कामे
अमरावती : शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनेपैकी एक असलेली जलयुक्त शिवार अभियानांंतर्गत सन २०१६ करिता २९४ गावांची निवड झाली असून पहिल्या टप्प्यातील विकासकामांकरिता ४२ कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे.
गतवर्षी जलयुक्त शिवार योजनेच्या कामांकरिता २५३ गावांची निवड करण्यात आली होती. शासनाने या कामांकरिता ११५ कोटी रुपये निधी मंजूर केला होता. त्यापैकी ८६ कोटी रुपये निधी खर्च झाला असून अनेक कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. विविध विभागाच्या योजनांतून लोकसहभागातून ४ हजार ६०० कामे पूर्ण झाली आहेत. या वर्षाकरिता जलयुक्त शिवार योजनेच्या तालुका समितीच्या वतीने आढावा घेऊन तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना १५ जानेवारीपर्यंत कामाचे आराखडे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावे लागणार आहे. तर २६ जानेवारीपासून यावर्षीच्या जलयुक्त शिवार योजनेतील नवीन कामाचा शुभारंभ होणार असून ३० जूनपर्यंत कामे पूर्ण करावयाची आहेत. त्याकरिता गुरुवारपासूनच तालुका पातळीवरील महसूल विभाग, कृषी विभाग व इतर विभागाचेही अधिकारी, कर्मचारी गावमुक्कांनी राहून नागरिकांच्या समस्या व शेततळे, नालाखोलीकरण, गावतलाव व इतर कामाच्या नियोजनासंदर्भात त्यांची मते जाणून घेणार आहेत. ग्रामीण भागात सिंचन व्यवस्था व्हावी व भविष्यात गावपातलीवर पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून शेततळे, नालाखोलीकरण, सिमेंटनाला, जुने बंधारे पुनर्जिवित करून त्याची दुरुस्ती करणे आदी कामे या योजनेंतर्गत करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)